शिवसेनेचे रणकंदन; सरकार बॅकफूटवर! विमानबंदी प्रकरणाचे संसदेत तीव्र पडसाद

69

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासहीत सर्वच विमान कंपन्यांनी घातलेल्या ‘प्रवासबंदी’च्या विरोधात शिवसेनेने आज लोकसभेत जबरदस्त रणकंदन केले. न्याय दो, न्याय दो, एअर इंडिया मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणा देत शिवसेना सदस्यांनी संसद दणाणून सोडली आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांना सभागृहातच घेराव घातला, तर खुद्द खासदार रवींद्र गायकवाड यांनी ‘माझ्या हातात विमानात शस्त्र होते काय, मग खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल कसा केला, असा सवाल करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यापाठोपाठ शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येत्या १० एप्रिलपर्यंत खासदार गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवली नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नाही, असा इशारा दिला. शिवसेनेच्या या रुद्रावतारामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेले आहे.

शिवसेनेच्या रणकंदनामुळे लोकसभेचे कामकाज तब्बल तीन वेळा तहकूब करावे लागले. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही असे उर्मट निवेदन केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी केल्यानंतर शिवसेना खासदारांनी त्यांना घेरावच घातला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व अनंतकुमार यांच्या मध्यस्थीमुळे राजू यांना काढता पाय घेणे शक्य झाले. यावेळी सभागृहात मोठा तणाव निर्माण झाला होता.

एअर इंडिया प्रकरणानंतर सर्वच विमान कंपन्यांनी कोणतीही खातरजमा न करता एकतर्फी निर्णय घेऊन खासदार गायकवाड यांच्यावर विमानबंदी घातली होती. ही बंदी म्हणजे संसद सदस्याच्या मूलभूत अधिकारावरच घाला आहे असे सांगत शिवसेनेने यापूर्वीही सनदशीर मार्गाने लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन ही बंदी उठविण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने कोणतीही कारवाई न केल्याने आज शिवसेना म्हणजे काय असते याची प्रचीती सरकारसह सर्वांनाच लोकसभेत दिसून आली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच लोकसभेतील गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी गायकवाड यांचा मुद्दा उपस्थित केला. शून्य प्रहरात हा मुद्दा देईन असे आश्वासन सभापतींनी दिले. त्यानुसार खासदार गायकवाड यांनी आपली बाजू समर्थपणे मांडली.

यापेक्षा निर्दोषत्वाचा आणखी कोणता पुरावा हवा?

या संपूर्ण प्रकरणात एअर इंडियाच्या एअर होस्टेसने जबाब दिला आहे. त्यात मी कोणतेही अशोभनीय वर्तन केले नसल्याचे म्हटले आहे. मग यापेक्षा माझ्या निर्दोषत्वाचा आणखी कोणता पुरावा हवा, असा खडा सवालही खासदार गायकवाड यांनी केला.

शिवसेनेची बैठक

तत्पूर्वी सकाळी संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना खासदारांची संसदेतील रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते.

शिवसेना वेलमध्ये; कामकाज ठप्प

केंद्रीय विमान वाहतूकमंत्र्यांच्या उद्दाम उत्तरामुळे संतप्त झालेल्या शिवसेना खासदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, गजानन कीर्तिकर, प्रताप जाधव, विनायक राऊत, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, संजय जाधव, कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या जबरदस्त घोषणाबाजीमुळे कामकाज सुरुवातीला दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १ व त्यानंतर १ वाजून १५ मिनिटांपर्यंत तहकूब करण्यात आले.

रवींद्र गायकवाडांनी असा काय गुन्हा केलाय?

देशात देशद्रोही, गुन्हेगार आणि बलात्कारीही मोठय़ा रुबाबात विमान प्रवास करतात, मग शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी असा काय गुन्हा केलाय की त्यांच्यावर विमानबंदी लादण्यात आलीय, असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला.एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांच्या  दादागिरीविरोधात व सरकारच्या बोटचेप्या धोरणाविरोधात लोकसभेत संताप व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने आज संसदेत पत्रकार परिषद घेतली त्यात  राऊत यांनी भूमिका मांडली. रवींद्र गायकवाडांनी कसा काय गुन्हा केलाय की त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले आहे आणि बंदी लादण्यात आली आहे, असा सवाल खासदार राऊत यांनी केला आहे. देशात देशद्रोही, गुन्हेगार, देश तोडण्याचे नारे देणारे, बलात्कारी मोठय़ा रुबाबात विमानाने प्रवास करू शकतात, फक्त गायकवाड करू शकत नाहीत असा टोला लगावत त्यांनी खासगी विमान कंपन्यांना फैलावर घेतले. खासदार गायकवाडांवर विमानबंदी ही एअर इंडियाची मनमानी आहे. असे सांगून खासदार राऊत पुढे म्हणाले, एअर इंडियाच्या सीएमडीची ही अरेरावी आहे. खासदारांचा अपमान करणाऱया, पोस्ट टाकणाऱया या अधिकाऱयावर तात्काळ कारवाई करा ही शिवसेनेची मागणी आहे. या कंपन्यांनी खासदार गायकवाड यांना टार्गेट केले आहे. यामागचा बोलविता धनी कोण आहे लवकरच समोर येईल. एका विमान कंपनीच्या प्रमुखावर तर कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप झाला होता याकडे पत्रकारांचे लक्ष वेधत आज ही मंडळी साधनशुचितेच्या गप्पा मारत आहेत. विजय मल्ल्याला विदेशी पळून जाण्यास मदत करणारी हीच मंडळी आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. संसदेचे कामकाज बंद पाडण्याची आमची मुळीच इच्छा नव्हती, मात्र नाइलाजाने आम्हाला हे करावे लागले, असेही राऊत यांनी नमूद केले. गायकवाड यांच्यावरची अन्यायकारक विमानबंदी उठवावी अशी मागणी आम्ही सुरुवातीपासूनच करतो आहोत. आता जे काय करायचे ते सरकारने करावे, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

या पत्रकार परिषदेला लोकसभेतील गटनेते खासदार आनंदराव अडसूळ, खासदार गजानन कीर्तिकर, चंदक्रांत खैरे, अरविंद सावंत, संजय जाधव, शिवाजीराव आढळराव-पाटील, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, रवींद्र गायकवाड, कृपाल तुमाने, प्रताप जाधव, राजन विचारे, विनायक राऊत, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते.

सुरक्षा वाढविण्याची विमान कंपन्यांची मागणी

रविंद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी लवकरात लवकर उठवा अन्यथा एकही विमान उडू देणार नाही असे शिवसेनेने बजावल्याने सर्व विमान कंपन्या हादरल्या आहेत. मुंबई आणि पुण्यात सुरक्षा वाढविण्याची मागणी एअर इंडीया तसेच अन्य विमान कंपन्यांनी केली आहे.

मला या सरकारची शरम वाटते! अनंत गीतेंचा संताप

या संपूर्ण प्रकरणात सरकार केवळ राजकारण करत असून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पाहून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या रागाचा पारा चढला. मी मंत्री असलो तरी या सभागृहाचा सदस्य आहे. याप्रकरणी खासदार गायकवाड यांच्यावर दिल्ली पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा कलम ३०८ चा गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही चौकशीशिवाय असा गुन्हा कसाकाय दाखल होऊ शकतो, तसेच पूर्ण चौकशीशिवाय प्रवासबंदी कशीकाय लादता येते, असा उद्विग्न सवाल गीतेंनी यावेळी केला. मोदी सरकार चौकशीशिवाय अशी बंदी कशी लादू शकते? याची मलाच शरम वाटते, असे उद्गार त्यांनी काढले.

कोणत्या कायद्याने बंदी घातली ते सांगा! तृणमूलचा हल्लाबोल

कुठेही संचार करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलेले असताना खासदार रवींद्र गायकवाड यांना विमानबंदी कोणत्या नियमाने घातली, असा सवाल तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट अशोक राजू यांनाच केला. शिवसेनेच्या मागणीशी आपण पूर्णतः सहमत असून ही बंदी अन्यायकारक तसेच घटनेचे उल्लंघन करणारी आहे. ती त्वरित उठवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी तृणमूलच्या खासदारांनी शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

सुरक्षेशी तडजोड नाही-राजू

विमानातून हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे या प्रवाशांचे हित लक्षात घेऊन सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे उद्दाम उत्तर देत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी खासदार गायकवाड यांच्यावरील विमानबंदी उठविण्याबाबत असमर्थता दर्शवली.

माझ्या हातात शस्त्र होते का? मग खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा का दाखल केला? खासदार रवींद्र गायकवाड यांचा सवाल

एअर इंडियाप्रकरणी केवळ एकतर्फी बाजू समजून घेऊन माझ्यावर प्रवासबंदी घातली आहे. तो माझ्या मूलभूत अधिकारावर घाला आहे. मीडिया ट्रायल घेऊन बदनामी केली जात आहे. संसदेचा सदस्य असताना माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०८) गुन्हा दिल्ली पोलिसांनी दाखल केला आहे. माझ्या हातात शस्त्र होते का? मग खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा का दाखल केला, असे बिनतोड सवाल शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केला. विमानबंदीच्या वादानंतर खासदार गायकवाड आज दोन आठवड्यांनी संसदेत दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडत सरकार आणि एअर इंडियावर जोरदार हल्ला चढवला.

मी निर्दोष आहे. बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार संसदेची माफी मागतो, पण उद्दाम अधिकाऱ्याची माफी कदापि मागणार नाही. हा केवळ माझा अपमान नाही तर संसदेचा अपमान आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत खासदार गायकवाड यांनी बजावले.

एअर इंडिया प्रकरणानंतर माझी मीडिया ट्रायल सुरू आहे. मी अमुक तिकीट बुक केले अशा अफवा पसरवल्या जात आहेत. गनिमी कावा कसा करायचा असतो हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले आहे असा टोला लगावत एअर इंडियाच्या कर्मचाऱयांनी मला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची चौकशी करा आणि एअर इंडियाच्या सीएमडीवर कठोर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. माझ्याशी एअर इंडियाच्या कर्मचाऱयांनी कशा पद्धतीने अरेरावी केली त्याचे व्हिडीओ फुटेजही माझ्याकडे आहे ते आपणास मी दाखवू शकतो. आपण सभागृहाच्या पालक आहात. मला तर आपण आईसारख्या आहात, तुम्हीच आता काय तो न्याय द्यावा आणि माझ्यावरची विमानबंदी हटविण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी खासदार रवींद गायकवाड यांनी सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या