वय वाढत आहे …? काय खाल…काय टाळाल?

वय वाढल्यावर पचनशक्ती क्षीण होणे, अपचन होणे, वारंवार पोट बिघडणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच वाढत्या वयामुळे रोगप्रतिकार क्षमता आणि स्नायूंची शक्ती कमी कमी होत जाते. यामुळे रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार होण्याचीही दाट शक्यता असते. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी खाण्याच्या सवयी, आवडीनिवडी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी काय कराल ?

ज्येष्ठ नागरिकांनी पपनस हे फळ किंवा त्याचा ज्युस घेणं टाळावे. ज्येष्ठ नागरिक अनेक वेळा औषध घेत असतात. पपनसमुळे औषधांची परिणामकारकता कमी होते, म्हणून वृद्धांनी या फळाचे सेवन टाळावे. त्या ऐवजी वृद्ध व्यक्तींनी लिंबू पाण्याला प्राधान्य द्यावे.

कच्च्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि फायबर असते. त्यामुळे बऱ्याच जणांना या भाज्यांचे ‘सलाड’ बनवून खायला आवडतात. पण वाढत्या वयामुळे दात आणि शरीर कमजोर झाले असल्यास कच्च्या भाज्या खाण्याऐवजी त्या व्यवस्थित शिजवून खा.

गाजर, भोपळा, बीट या फळभाज्यांच्या ज्यूसचा आहारात समावेश करा.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ आणि इतरही पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, मात्र कच्ची मोड आलेली कडधान्ये ज्येष्ठांना पचतीलच असे नाही. तसेच मोड आलेल्या कडधान्यांमध्ये विषाणू असण्याचीही शक्यता असते. ज्यामुळे आजार होऊ शकतात. त्यामुळे कच्ची मोड आलेली कडधान्ये उकडून खावीत.

वाढत्या वयात जास्त मिठाचे पदार्थ खाणे टाळा. अति मीठ घातलेले, चटकदार पदार्थ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढू शकते. यामुळे ह्रदयविकार आणि स्ट्रोक येण्याचा धोका असतो.

पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्व ए, सी आणि के जास्त प्रमाणात असते. त्यामध्ये कॅलरीजही कमी असतात. त्यामुळे ज्येष्ठांनी या भाज्यांचा आहारात जरूर समावेश करावा, मात्र त्याचे प्रमाण मर्यादीत ठेवावे.

राजमा, छोले ही कडधान्ये आठवड्यातून फक्त एकदाच खा.

वाढत्या वयाबरोबर व्यसनाचे प्रमाण कमी करायला हवे. कारण यामुळे झोपेवर दुष्परिणाम होतो आणि रक्तदाबाचे प्रमाणही वाढते. व्यसनाच्या सवयीमुळे शरीरावर औषधांचा परिणाम होत नाही. व्यसन टाळल्यास उत्तम

आपली प्रतिक्रिया द्या