ममता बॅनर्जींनी बिनशर्त माफी मागावी; संपकरी डॉक्टरांची मागणी

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या संपामुळे शुक्रवारीही आरोग्यसेवेवर परिणाम झाला. त्यामुळे ममता बॅनर्जी सरकार आणि डॉक्टरांमधील संघर्ष वाढत आहे. त्यातच शुक्रवारी काही डॉक्टरांनी सामुहीक राजीनामे दिले आहेत. आता डॉक्टरांनी कामावर रुजू होण्यासाठी सहा अटी सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्यात ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांची बिनशर्त माफी मागावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. चार दिवसांपासून संपावर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की , ममता बॅनर्जी यांच्या गुरुवारच्या भाषणाबाबत त्यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांशी ज्या पद्धतीने डॉक्टरांबाबत बोलल्या, ते योग्य नसल्याचे ज्युनिअर डॉक्टर फोरमचे प्रवक्ते अरिंदम दत्ता यांनी सांगितले. राज्याबाहेरचे काही लोक, भाजपा आणि सीपीआय डॉक्टरांना भडकावत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला होता. यावर डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संप मागे घेण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या सहा अटींमध्ये ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात येऊन जखमी डॉक्टरांची भेट घ्यावी, तसेच त्यांनी या हल्ल्याचा निषेध करावा. त्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबतही त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्यात ज्युनिअर डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉक्टरांवरील हल्ले वाढले आहेत, हे चिंताजनक असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. डॉक्टरांनी निर्भीडपणे काम करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. विशेष करुन वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांवर होणारे हल्ले गंभीर असल्याचे पत्रात म्हटले आहे.

संपकरी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी सामुहीक राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत 119 डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. या समस्येची राज्य सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.