इंधन दरवाढीविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना आक्रमक; कुडाळात आंदोलन

पेट्रोल-डिझेलची भरमसाठ दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय-हाय, चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव, रद्द करा रद्द करा पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा, दरवाढ कमी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कुडाळ प्रांत कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले. केंद्र सरकार आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची भरमसाठ दरवाढ केली आहे. या दरवाढीविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना आक्रमक झाली असून सोमवारी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात फलक व झेंडे घेऊन केंद्रातील भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिवसेना हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख आणइ आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, माजी सभापती राजन जाधव, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, विभाग प्रमुख बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, नगरसेवक गणेश भोगटे, सचिन काळप, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, तालुका प्रमुख राजू जांभेकर, संदीप म्हाडेश्वर, दिपक आंगणे, कृष्णा तेली, योगेश धुरी, बाबी गुरव, सुयोग ढवण, सिद्धेश धुरी, राजू गवंडे, नितीन राऊळ, उदय मांजरेकर, सागर जाधव, रूपेश कांबळी, बाळू पालव, गोट्या चव्हाण, अॅड.सुधीर राऊळ, ओंकार दळवी आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचेही सिंधुदुर्गात आंदोलन
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीविरोधात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर बैलगाडी आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. कुडाळ एस.एन.देसाई चौक येथून या बैलगाडी आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. या चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाडी व पायी चालत जात हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अशा घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ मागे घ्यावी याबाबतचे निवेदन केंद्र सरकारकडे पाठविण्यासाठी तहसीलदार रविंद्र नाचणकर यांच्याकडे देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या