संगणक परिचालकांचे बेमुदत उपोषण सुरू

सामना प्रतिनिधी, जळगाव

राज्यातील सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार निवेदन देण्यात आले आहे. मात्र या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. तर संघटनेने आता सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे फेब्रुवारी २०१७ पासून मानधन रखडले आहे. यामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे बऱ्याच संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याबाबत वेळोवेळी संबंधितांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. परिचालकांनी राज्यात शेतकऱ्यांप्रमाणेच संगणक परिचालकांनाही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेचे फॉर्म रात्र अपरात्री जागून भरले. परंतु शासनाने याबाबत उपाययोजना न करता उलट टास्क कन्फर्मेशन या गोंडस नावाखाली जाचक अटी लागू केल्या आहेत. याबाबत मानधन का कपात करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रामविकास विभागाचे असिम गुप्ता यांनी ३ ऑक्टोबर रोजीच्या निवडणूक कामाच्या पत्रामध्ये व्हिएलई म्हणून उल्लेख करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तरी राज्य शासनाने दोन वर्षांपासून दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे २५ सप्टेंबरलाही लक्षवेधी काम बंद आंदोलन केले होते. ठोस उपाययोजना होत नसल्याने संगणक परिचालकांनी पुन्हा १२ ऑक्टोबरपासून राज्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदसमोर जिल्ह्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र चार दिवस उलटूनही याकडे कानाडोळा केल्याने सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेला देण्यात आले. यावेळी चोपडा तालुकाध्यक्ष प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय बिऱ्हाडे, पंकज पाटील, सुरेश बोहरी, रामचंद्र पाटील, जीतेंद्र माळी, शशिकांत बारी, विनोद पाटील, दीपक वाघ, मयूर बोरोले, सचिन किंचुरकर, राहुल मोर, कैभव चौधर, हर्षल येवले, विशाल माने उपस्थित होते.