मराठा क्रांती मोर्चाचे शुक्रवारी पारनेरमध्ये ठिय्या आंदोलन

सामना प्रतिनिधी । पारनेर

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तालुका बंदच्या आवाहनास तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. पारनेर शहर तसेच टाकळी ढाकेश्‍वर, सुपा, कान्हूरपठार, अळकुटी, जवळे आदी प्रमुख गावांसह खेडयापाडयात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे शाळा महाविद्यालयांसह राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँका, पतसंस्थाही दिवसभर बंद होत्या. दरम्यान, समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

तालुक्यात गुरूवारी बंदचे आयोजन करण्यात आले होते. निघोज, भाळवणी तसेच वडनेर बुद्रुक येथे बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर उर्वरीत तालुक्याने गुरूवारी बंदमध्ये सहभाग नोंदविला. सकाळी ८ वाजता सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते बसस्थानक चौकात जमा झाले. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

राज्यभर आंदोलन पेटल्याच्या पार्श्‍वभुमीवर पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. गुरूवारी पारनेर नगरपंचायतीची मासिक बैठक होती. आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर आंदोलनास पाठींबा म्हणून मासिक सभा तहकूब करण्यात आल्याचे नगराध्यक्षा वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितले. आंदोलनास पाठींबा देण्याचा ठराव नगरसेवक किसन गंधाडे यांनी मांडला, त्यास सर्व नगरसेवकांनी एकमुखी पाठींबा दर्शविला.

अळकुटी येथे सकाळी निषेध सभा घेण्यात आली. सकल मराठा समाजाने आवाहन केल्यानंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. शासकिय कार्यालयांबरोबरच शाळा तसेच महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले. सुपे येथे नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलनात सहभाग नोंदविण्यात येउन मराठा आरक्षणास पाठींबा जाहीर करण्यात आला.

तालुका बंदच्या पार्श्‍वभुमीवर एसटीच्या पारनेर आगराने सलग दुस-या दिवशी एकही बस आगारातून बाहेर सोडली नाही. परिणामी तालुक्यातील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सायंकाळी यात्रेकरूंना घेउन येण्यासाठी तिन बस पंढरपूरकडे सोडण्यात आल्या, मात्र प्रवासी नसल्याने नगरपर्यंत त्या मोकळयाच गेल्या. शुक्रवारपासून आगारातील सर्व फे-या नियमित सुरू करण्याचे नियोजन असल्याचे आगार प्रमुख पराग भोपळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या