धुळे पालिकेच्या कामकाजाविरोधात शिवसेनेचे आंदोलन

10

सामना प्रतिनिधी । धुळे

महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय इमारत रक्कम 10 कोटींवरून 18 कोटींपर्यंत कशी पोहचली? राज्यात ग्रीन इमारतीचे पहिले मॉडेल म्हणून गवगवा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात इमारतीत बदल करण्यात आला. संपूर्ण इमारत झाल्यावर इलेक्ट्रिक फिटिंग करण्यात आल्याने लाखो रुपयांचा जास्तीचा खर्च झाला. चौथ्या विंगचे बांधकाम न करता पूर्ण बिल अदा करण्यात आले. इतके पैसे खर्च करूनही इमारत गळकी का, असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करीत निदर्शने केली.

शिवसेनेचे महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी यांनी महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, अशा तक्रारी यापूर्वीच केल्या आहेत. पण आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या गैरव्यवहाराकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करीत निदर्शने केली. यासंदर्भात परदेशी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, इमारतीचे फर्निचर सुमार दर्जाचे आहे. अडीच कोटींच्या फर्निचरसाठी कुठलेही नियोजन, रंगसंगती नाही. नियोजनाशिवाय टेबल, कपाटे तयार केली. आता त्याची तोडफोड करून पदाधिकाऱ्यांची दालने वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. इलेक्ट्रिक फिटिंगच्या पाइपमुळे विद्रुपीकरण झाले आहे ते झाकण्यासाठी लाखो रुपयांचे पीओपी सीलिंगचे काम सुरू आहे.

इमारतीसाठी 10 लाख रुपये खर्चाचे वातानुकूलित यंत्रे बसविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पण प्रत्यक्षात त्यापूर्वीच इमारतीत वातानुकूलित यंत्रे बसविण्यात आली होती. महापालिकेच्या रुग्णालयात श्वानदंश प्रतिबंधात्मक लस नाही. शहरासाठी असलेल्या 134 कोटी रुपयांच्या पाणी योजनेत अधिकारी, ठेकेदार आणि राजकारण्यांची युती झाली असून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. पुरेसा निधी असूनही महापालिका कचऱयाची विल्हेवाट लावू शकत नाही. घरकुल योजनेच्या माध्यमातून जुने धुळे, यशवंत नगर, मोहाडी, लेनीन चौक आणि पेठ भागात घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. महासभेने ज्या लाभार्थ्यांना मान्यता दिली त्यांना घरेच मिळाली नाहीत. या सर्व प्रकरणांची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.

या आंदोलनात सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, भूपेंद्र लहामगे, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, महानगर संघटक विजय भट्टड, डॉ. सुशिल महाजन, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, महेश मिस्तरी, माजी महापौर भगवान करनकाळ, हेमलता हेमाडे, नंदू फुलगारे, प्रफुल्ल पाटील, संदीप चव्हाण, विकास शिंगाडे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या