‘टिकटॉक’वर अलिबागची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

2

सामना प्रतिनिधी । अलिबाग

‘टिकटॉक’ या सोशल साईडवर अलिबागची अस्मिता आणि प्रतिमा मलिन करण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत अलिबागच्या नागरिकांनी एकत्र येऊन अलिबागची बदनामी करणारा व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि असे प्रकार थांबण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना निवेदन दिले. टिक टॉकवर तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ पुणे येथील तरुण तरुणींनी केला आहे.

‘अलिबाग से आया क्या’ या वाक्य असलेल्या व्हिडिओमुळे अलिबागच्या अस्मितेला ठेच पोहचत असून शहराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘अलिबाग से आया क्या’ हा संवाद अनेक वेळा सिनेमा, टिव्ही शो मध्ये सर्रास वापरण्यात येतो. याविरोधात नागरिकांनी आवाज उचलून अनेकवेळा निषेध व्यक्त केला आहे. या निषेधानंतर या वाक्याचा दुरुपयोग करणाऱ्या अभिनेत्यांनी नंतर माफीही मागितली आहे. मात्र, तरीही अलिबागची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार सुरूच आहे. याबाबत अलिबागचे राजेंद्र ठाकूर यांनी उच्च न्यायालयात रीट अर्ज दाखल केला आहे. टिक टॉक या सोशल साईटवर वेगवेगळे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. अलिबागबाबत असाच एक व्हिडिओ पुणे येथील तरुण मुले, मुलींनी बनविला आहे. यामध्ये आम्ही अलिबागवरून आलो आहोत का असा उपरोधिकपणे उल्लेख या तरुणांनी केला आहे. यामुळे अलिबागच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे.

टिक टॉकवर केलेल्या या व्हिडिओतील तरुणांवर कायदेशीर कारवाई करावी व असे प्रकार थांबले पाहिजे यासाठी अलिबागमधील तरुण एकत्र येऊन जिल्हा पोलिस अधीक्षक, अलिबाग पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन दिले. अलिबाग बाबत असे प्रकार वारंवार घडत असून यावर कायम स्वरूपी तोडगा शासनाने काढावा अशी मागणीही करण्यात आली आहे. राजेंद्र ठाकूर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील, मनसे तालुकाध्यक्ष महेश कुंनुमल, अॅड. महेश ठाकूर, अब्दुला मुल्ला यांनी हे निवेदन दिले आहे.