उंचे लोग उंची पसंद!

941

गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत कमल निवासात विराजमान झाले. सत्तेचा तीळगूळ सगळय़ांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे. मित्र म्हणून आम्ही त्यांना हे सांगत आहोत. शेवटी काय उंचे लोग उंची पसंद!

उंचे लोग उंची पसंद!

भारतीय जनता पक्ष हा अजून तरी आमचा मित्रपक्षच आहे. त्यामुळे आम्ही त्यांना नेहमीच सुयश चिंतीत आलो. उंचे लोग उंची पसंद असे त्यांच्याविषयी म्हटले जात असेलही, पण राजकारणात जो तो आपापले पत्ते पिसत असतो व फेकत असतो. सध्या शिवसेना-भारतीय जनता पक्षात जागावाटपावरून चर्चेच्या फेऱया झडत आहेत. काही लोक या फेऱ्यांना ‘गुऱ्हाळ’ म्हणत असले तरी या गुऱ्हाळातून ‘मळी’ निर्माण होणार नाही तर गुळाचाच गोडवा राहील असे वाटते, पण सत्ताधारी पक्ष असल्यामुळे सध्या अनेक लोक त्यांच्या दारात तीळगुळासाठी उभे आहेत व दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत तीळगूळ भरवण्याचे ‘गोड’ कार्यक्रम सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष हा साधनशूचिता वगैरे मानणाऱ्यांपैकी असल्याचे अनेक वर्षे बोलले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष, लालू यादवांचा राष्ट्रीय जनता दल, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस हे पक्ष भ्रष्ट, टाकाऊ, चारित्र्यहीन, गुंडांचे पक्ष म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. देशाच्या राजकारणाची गढूळ गंगा कोण शुद्ध करील तर तो भारतीय जनता पक्षच. राजकारणातील गढूळ प्रवाह नष्ट करून शुद्ध चारित्र्याचे, गुंड-झुंड मुक्त असे राजकारण कोण करेल तर तो फक्त सध्याच्या मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच, असे लोकांना वाटत होते. पण

तीळगुळात मिठाचा खडा

यावा किंवा दगड येऊन दात कचकन पडावा असे प्रकार घडू लागले आहेत. वयाची नव्वदी पार केलेले काँग्रेसचे बुजुर्ग नेते (सर्वच बाबतीत) नारायणदत्त तिवारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबत त्यांचे सुपुत्र आहेत. तिवारी यांचे जोरदार स्वागत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमित शहा यांनी केले. तिवारी यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ भाजपास मिळेल असे सांगण्यात आले. आता हा अनुभव आणि मार्गदर्शन नक्की कोणते, त्याचा खुलासा होणे गरजेचे आहे. लोकांच्या मनात भलत्यासलत्या शंका नकोत. तिवारी हे आणीबाणीचे समर्थक होते व ज्या ‘गांधी’ परिवाराला सध्याचा भाजप अजिबात मानत नाही त्या गांधी परिवाराचे ते ‘जोडेपुसे’ होते.

ना मै नर

 ना मैं नारी

मैं एनडी तिवारी

इंदिरा का पुजारी

असे ते स्वतःविषयी अभिमानाने सांगत. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी अनेक दंतकथा प्रकाशित झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना ‘राजभवनात’ घडलेले सेक्स कॅण्डल तिवारींना घेऊन बुडाले. तेथील राजभवनाचा गैरवापर चालला आहे, तिवारींची हकालपट्टी करा, अशी मागणी त्यावेळी करणाऱ्यांत भाजप आघाडीवर होता. मात्र आता त्याच तिवारींनी हाती कमळ घेतले आहे व त्यांच्या अनुभवाचा गुलाबी सुगंध भाजप परिवारास धुंद करणार आहे. अर्थात असे अनेक

तिवारीमंडळ

सत्ताधाऱ्यांच्या गंगेत डुबक्या मारून स्वतःस पावन करून घेत असतात. उत्तर प्रदेशात तेच सुरू आहे व महाराष्ट्रातही तेच तेच चालले आहे. गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत ‘कमल निवासा’त विराजमान झाले. भाजप हा गुंडांचा पक्ष अशी टीका अजित पवारांनी केली. कारण हे सर्व लोक कालपर्यंत राष्ट्रवादीत होते व अजित पवार गुंडांचे आश्रयदाते असल्याची टीका कालचा विरोधी पक्ष करीत होता. अजित पवार आपल्या जागी आहेत. फक्त गुंडांनी आश्रयदाते बदलले आहेत. मनगटावरचे घडय़ाळ सोडून कमळ घेतले व देवपूजेला लागले. अनेक नामचीन लोक राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व चारित्र्याचे काय? असे विचारले जाऊ शकते. कलंकित नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊ नये, असे रामदास आठवले यांनाही सांगावे लागले. सत्तेचा तीळगूळ सगळय़ांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे. मित्र म्हणून आम्ही त्यांना हे सांगत आहोत. शेवटी काय उंचे लोग उंची पसंद!

आपली प्रतिक्रिया द्या