‘ती’ सध्या पुण्यात घाबरते!

76

सायबर सिटी’, ‘आयटी हबही बिरुदे पुण्यासाठी अभिमानाची असली तरी महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या खुनाचे शिंतोडे या बिरुदावर सातत्याने उडत असतील तर त्याचा काय उपयोग? महिलांनी कोणत्या कायदासुव्यवस्थेच्या भरवशावर नोकरीच्या ठिकाणी जायचे? रसिला ओपीची हत्या म्हणजे महिला सुरक्षेचाखूनआहे. ‘तीसध्या पुण्यात घाबरते या वस्तुस्थितीवर रसिला खून प्रकरणाने शिक्कामोर्तबच केले आहे.

तीसध्या पुण्यात घाबरते!

सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर ही पुण्याची ओळख आता खरोखरच राहिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना पुण्यात सातत्याने घडत आहेत. विशेषतः महिला सुरक्षेच्या बाबतीत तर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहील असेच पुण्याचे वातावरण आहे. इतर सर्वच शहरांप्रमाणे पुण्याचाही चेहरामोहरा मागील दोन-अडीच दशकांत बदलला. या शहराची काही वैशिष्टय़े कायम असली तरी मूळ ओळख मात्र पुसट झाली आहे. कॉस्मोपॉलिटन संस्कृतीपासून रेव्ह पार्ट्यांसारख्या ‘पेज थ्री कल्चर’पर्यंत, ‘सीमी’सारख्या दहशतवादी संघटनांपासून नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालीपर्यंत, दिवसाढवळ्या होणाऱ्या खूनखराब्यापासून भूखंड माफियांच्या ‘गँगवार’पर्यंत अशा अनेक वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृतींचे मुखवटे पुण्याच्या चेहऱ्यावर घट्ट बसले आहेत. त्यात ‘आयटी हब’ या आणखी एका मुखवट्याची भर पडली आहे. बंगळुरू, हैदराबादनंतर पुणे असे एक चित्र मधल्या काळात निर्माण झाले. ते खरेदेखील आहे. मात्र पुण्याचे ‘आयटी हब’ हल्ली वारंवार चर्चेत येत आहे ते तेथील खून-बलात्कारांमुळे. प्रामुख्याने पुण्याच्या आयटी उद्योगातील नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा आणि जीविताचा प्रश्न जास्तच गंभीर होत चालला आहे. रसिला राजू ओपी या तेथील सॉफ्टवेअर इंजिनीयर तरुणीच्या खुनाने हाच मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. ‘इन्फोसिस’सारख्या नामांकित कंपनीत रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी रसिला एकटी कामावर येते आणि तेथील सुरक्षा रक्षकांकडूनच तिचा खून होतो हा सर्वच प्रकार भयानक आहे. एकटक बघत असल्याबद्दल रसिलाने सुरक्षा रक्षकाला जाब विचारला आणि तोच तिचा गुन्हा ठरला. त्या दोघात वादावादी झाली आणि नंतर त्याने संगणकाच्या केबलने रसिकाचा गळा आवळून खून केला. आता तो अटकेत असला तरी पुणे महिलांसाठी असुरक्षित शहर बनल्याचा डाग या घटनेने आणखी गडद केला आहे. शिवाय रसिलासोबत त्या विभागात काम करण्यासाठी अन्य महिला सहकारी किंवा इतर वरिष्ठ सोबत कसे नव्हते? एवढा गाफीलपणा कसा केला गेला? सुट्टीच्या दिवशी कर्मचारी संख्या कमी असते हे गृहीत धरून अशावेळी महिला कर्मचाऱ्यांना जर कामासाठी यावे लागत असेल तर त्यांच्या सुरक्षेची कंपनी प्रशासनाने आणखी काळजी घ्यायला नको का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. रसिलासोबत काम करताना एखाद दुसरा सहकारी सोबत असता तर तिचे प्राण नक्की वाचले असते. महिनाभरात महिला सॉफ्टवेअर इंजिनीयरची हत्या होण्याची पुण्यातील ही दुसरी घटना आहे. महिनाभरापूर्वी तळवडे येथे अंतरा दास या इंजिनीयर तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला होता. सात वर्षांपूर्वी नयना पुजारी या संगणक अभियंता महिलेचे अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाने पुण्यात खळबळ माजवली होती. या सात वर्षांमध्ये महिला सुरक्षेच्या चिंधड्या वारंवार उडतच आहेत. नयना पुजारी खूनखटला आजही प्रलंबित आहे. याच महिन्यात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी मगरपट्टा भागात प्रिन्सिपल फायनान्स सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचीही प्रियकराने गाडीतच हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने गाडीचालकाच्या सतर्कतेमुळे ती बचावली. कोथरूडमधील सिटीप्राईडसमोर एका मोलकरणीचीही भल्या सकाळी भर रस्त्यात निर्घृण हत्या केली गेली. लग्नास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीला सात-आठ जणांनी सेनापती बापट रस्त्यावर फरफटत नेत मारहाण केली होती. विषारी इंजेक्शन देऊन तिला मारण्याचाही प्रयत्न केला, पण नागरिकांमुळे तिचे प्राण वाचले. एकीकडे सरकार महिला सुरक्षा, महिला सबलीकरणाच्या गप्पा मारते; पण दुसरीकडे पुण्यासारख्या ‘सांस्कृतिक’ राजधानीत वर्षाला अडीचशे बलात्कार आणि ५०० च्या पुढे विनयभंगाचे गुन्हे दाखल होतात. ‘सायबर सिटी’, ‘आयटी हब’ ही बिरुदे पुण्यासाठी अभिमानाची असली तरी महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या खुनाचे शिंतोडे या बिरुदावर सातत्याने उडत असतील तर त्याचा काय उपयोग? महिलांनी कोणत्या कायदा-सुव्यवस्थेच्या भरवशावर नोकरीच्या ठिकाणी जायचे? रसिला ओपीची हत्या म्हणजे महिला सुरक्षेचा ‘खून’ आहे. ‘ती’ सध्या पुण्यात घाबरते या वस्तुस्थितीवर रसिला खून प्रकरणाने शिक्कामोर्तबच केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या