
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकट काळात मदतीचा हात म्हणून कृषी खात्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज या निर्णयाची माहिती दिली.
कृषी खात्यात गट अ ते गट ड श्रेणीमध्ये एकूण 23 हजार 959 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांची मिळून एक दिवसाच्या एकत्रित वेतनाची 6 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीत जमा केली जाणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
कृषी विभागासह राज्यातील चार कृषी विद्यापीठे, महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, कृषी विभागाची महामंडळे तसेच इतर प्रकल्प यांनीही एक दिवसाचे वेतन देण्याचे कबूल केले आहे. तसेच कृषी मंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
























































