खतासोबत दुसरे उत्पादन घेण्याची शेतकऱ्यांवर जबरदस्ती, लिंकिंगमुळे कृषिविक्रेत्यांचा बेमुदत बंदचा इशारा

संपूर्ण राज्यात कृषीविक्रेत्यांवर लिंकिंगची सक्ती केली जात आहे. म्हणजेच काही कंपन्या या त्यांचा माल विकला जावा यासाठी शेतीसाठी लागणारी खते, बियाणे इत्यादी गोष्टींची विक्री करणाऱ्या कृषीविक्रेत्यांवर रासायनिक खतांसोबत दुसरे उत्पादन विकण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. कंपन्यांकडून केली जात असलेल्या या जबरदस्तीमुळे शेतकऱ्यांना गरज नसतानाही पैसे मोजून नको ती उत्पादने विकत घ्यावी लागत आहे. नको असलेली उत्पादने घेतली नाही तर या शेतकऱ्यांना कृषीविक्रेते त्यांना हवी ती उत्पादने विकतच नाहीयेत. ही संपूर्ण राज्यात एक मोठी समस्या बनली असून या जबरदस्तीविरोधात कृषीविक्रेत्यांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

हा प्रकार चुकीचा असल्याचे दोन वर्षांपूर्वी रसायने आणि खते विभागाच्या केंद्रीय सहसचिव नीरजा आदीदाम यांनी म्हटले होते. त्यांनी याबाबतचे पत्रही प्रसिद्ध केले होते, मात्र तरीही हा प्रकार थांबलेला नाही. सातारा जिल्ह्यातील कृषीविक्रेत्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली. हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यातीत असल्याने एका जिल्ह्यापुरता आदेश जारी केला जाऊ शकत नाही असे कळते आहे.