डास चावल्याने नवऱ्याला चोपले

952

डास चावल्याने संतापलेल्या पत्नीने पतीला मुसळीने चोपल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली आहे. यात मुलीनेही आईची साथ देत पित्याला बेदम मारहाण केली.  यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून आठ टाके पडले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपी महिलेला व तिच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. भूपेंद्र असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. तर संगिता असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.

 भूपेंद्र नरोदा येथे पत्नी संगिता व मुलगी शितलबरोबर राहतो. भूपेंद्र एलईडी लाईटचा व्यवसाय करतो. पण त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती. दोन महिन्याचे लाईट बिलही त्याने भरले नव्हते. यामुळे लाईट कापण्यात आले होते. यावरून पत्नी व मुलगी त्याच्याशी सतत भांडत. मंगळवारी रात्रीच्या वेळेस संगिताला झोपेत डास चावल्याने तिची झोपमोड झाली. यामुळे संतापलेल्या संगिताने बेडवर बाजूला झोपलेल्या भूपेंद्रला लात मारली व बेडवरून खाली पाडले. या प्रकारामुळे भांबावलेल्या भूपेंद्रने संगिताला शांत राहण्यास सांगितले.पण ती अधिकच भडकली तिने किचनमधून मुसळ आणली व भूपेंद्रला मारण्यास सुरुवात केली. हे बघताच शितललाही चेव चढला. तिनेही काठी आणली व वडीलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. भूपेंद्र मदतीसाठी ओरडत असल्याने त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनीं त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर भूपेद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून आठ टाके पडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या