अहमद पटेल यांच्यानंतर काँग्रेसचे नवीन खजीनदार कोण… ‘या’ नावांची चर्चा…

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्याने काँग्रेसमध्ये खजीनदार पद रिक्त झाले आहे. त्यामुळे पक्षातील कोणाला या पदाची जबाबदारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे. येत्या काही महिन्यात पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षाला या पदावर तातडीने नियुक्ती करावी लागणार आहे. हे पक्षातील महत्त्वाचे पद असल्याने या पदासाठी विश्वासू व्यक्तीची निवड केली जाते. या पदासाठी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, वरिष्ठ नेते कसी वेणुगोपाल आणि मिलिंद देवरा यांच्या नावांची या पदासाठी चर्चा सुरू आहे. मात्र गेहलोत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी असल्याने सत्ता सोडण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे कमलनाथ, वेणुगोपाल आणि देवरा यांच्यापैकी एकाला हे पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कमलनाथ मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासह विधानसभेतील विरोध पक्षनेत्याचे पद सोडण्यास इच्छुक असल्याने त्यांचा नावाचा विचार खजिनदार पदासाठी होत असल्याची चर्चा आहे. खजिनदारपदी त्यांची नियुक्ती झाल्यास मध्य प्रदेशात काँग्रेस अध्यक्षपदासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.

केसी वेणुगोपाल सध्या महासचिव असून संघटनात्मक जबाबदारी सांभाळत आहेत. ते राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षात महत्त्वाचे पद देऊन संघटनात्मक जबाबदारी इतर नेत्यांकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच खजिनदार पदासाठी मिलिंद देवरा यांच्या नावाचीही चर्चा आहे.

येत्या काही महिन्यात पाच राज्यातील होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता या पदावर लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पक्षातील हे महत्त्वाचे पद असल्याने विश्वासू व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या