गुजरातमधील कोरोना रुग्णालयात आग, 8 रुग्णांचा होरपळून मृत्यू

1019

अहमदाबादमधल्या एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात होते. जे रुग्ण दगावले आहेत ते कोरोनाग्रस्त होते आणि त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते असं सांगण्यात येत आहे. रुग्णालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रुग्णालयाच्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान सहाय्यता निधीमधून 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. या घटनेची चौकशी 3 दिवसात संपवून आपला अहवाल सादर करण्याचे अहवाल तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.गुजरातमधील गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या दुर्घटनेची चौकशी करणार आहेत.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. आपण गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अहमदाबादचे महापौर यांच्याशी बोललो असून या आगीची झळ बसलेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अहमदाबादमधील श्रेय रुग्णालय हे कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी परावर्तित करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे 3.15 वाजता इथल्या अतिदक्षता विभागामध्ये आग लागली होती. क्षणार्धात या आगीने रौद्ररुप धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीमध्ये 8 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून रुग्णालयाचा एक कर्मचारी जखमी झाल्याचेही कळते आहे. आग लागली तेव्हा अतिदक्षता विभागात 10 रुग्ण होते तर एकूण मिळून रुग्णालयात 49 रुग्ण होते.या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे अहमदाबादचे सहपोलीस आयुक्त राजेंद्र असारी यांनी सांगितले आहे.

मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत

  • अरविंद भावसार
  • नवीनलाल शाह
  • लीलावती शाह
  • आयशाबेन तिरमीश
  • मनुभाई रामी
  • ज्योती सिंधी
  • नरेंद्र शहा
  • आरीफ मंसूर
आपली प्रतिक्रिया द्या