आधी अपहरण झालं, मग येऊ लागले विकृत फोन; हैराण झालेल्या डॉक्टरची पोलिसात धाव

999

आधी अपहरण करून नंतर सतत फोन करून त्रास देणाऱ्या विकृतांविरुद्ध एका डॉक्टरने पोलिसांत तक्रार केल्याची घटना अहमदाबाद येथे घडली आहे.

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथे काम करणाऱ्या डॉ. कल्पेश नाकुम यांच्यासोबत ही घटना घडली आहे. नाकुम हे भूलतज्ज्ञ म्हणून येथील एका प्रसुती केंद्रात काम करतात. साधारण आठ महिन्यांपूर्वी ख्रिसमसच्या रात्री त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना पळवून नेणारे हे त्यांनी प्रसुती पार पाडलेल्या एका महिलेचे नातेवाईक होते. ती महिला प्रसुतीदरम्यान दगावली होती. अपहरण झाल्यानंतर या नातेवाईकांनी नाकुम यांना जिवाची धमकी देत आपल्या चुकीमुळे महिला दगावल्याचं कबूल करून घेतलं आणि त्यांना सोडून देण्यात आलं. या अपहरणादरम्यान झालेल्या झटापटीत नाकुम यांच्या डोळ्याला जबर मार बसला होता.

त्यानंतर यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात नाकुम यांच्या फोनवर एक फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तिने त्यांना आपलं नाव हबीब सांगितलं आणि मामा आहेत का अशी चौकशी केली. नाकुम यांनी चुकीचा नंबर असल्याचं सांगूनही त्याने विश्वास ठेवला नाही आणि तो वाद घालत राहिला. नाकुम यांनी फोन कट केला आणि नंबर ब्लॉक करून टाकला.

त्यानंतर जून, जुलै या दोन्ही महिन्यात याच घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. नाकुम याने फोन करणाऱ्याला काहीही विचारायचा प्रयत्न केल्यानंतर समोरून फक्त हसण्याचा आवाज येत होता. शेवटचा कॉल त्यांना रविवारी आला आणि त्यानंतर मात्र नाकुम यांनी पोलिसात जायचा निश्चय केला. पोलिसांनी नाकुम यांची तक्रार नोंदवली असून त्यांना येणार फोन हे अहमदाबादच्या बाहेरून येत असल्याची माहिती मिळत आहे. या मागे कोण आहे, त्याचा तपास सुरू करण्यात आला असून लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या