गुजरातमध्ये बुराडी कांड, जादूटोण्याच्या आहारी जाऊन त्रिवेदी कुटुंबाची आत्महत्या

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

नवी दिल्लीमध्ये जादूटोणा आणि तंत्र-मंत्रच्या आहारी जाऊन कुटुंबातील 11 सदस्यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस येऊन काही महिने होत नाही तोच गुजरातमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. अहमदाबाद येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यामागे तंत्र-मंत्र आणि जादूटोण्याचा प्रकार असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल त्रिवेदी हे आपल्या कुंटुंबासह नरोदा येथील अवनी स्काय येथे भाड्याच्या घरात राहात होते. गेल्या 24 तासांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांचे नातेवाईक त्याना फोन करत होते, परंतु उत्तर मिळत नव्हते. याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिन सरकली.

बुराडी कांडसारखेच कुटुंब प्रमुख कुणाल त्रिवेदी यांनी गळफास लावून आत्महत्या केली. तर पत्नी कविता आणि 16 वर्षीय मुलगी शिरीन यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. घरामध्ये पोलिसांना एक वयस्कर महिला बेशुद्धावस्थेत सापडली. या महिलेने देखील विषारी औषध प्यायले होते. मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याने त्या वाचल्या. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात भरती केले असून उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी मिळाली सुसाईड नोट
तपासादरम्यान पोलिसांना बेडरूममध्ये सुसाईड नोट मिळाली. यात, ‘आई तू मला कधी समजू शकली नाही. मी अनेकवेळी तुला काळ्या शक्तीबद्दल सांगितले होते, परंतु तू कधी ते मान्य केले नाही आणि दारू प्यायल्याचे कारण देत होती, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की आम्ही कधीही आत्महत्या करू शकत नाही, परंतु काळ्या शक्तींमुळे आत्महत्या करत आहोत.