माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेच्या दुसऱया टप्प्याचा आज समारोप, नगरमधील 62 हजार घरंची तपासणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचा समारोप उद्या (दि. 25) होत आहे. नगर शहरात मनपाच्या पथकांकडून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवार (दि. 23) अखेर पथकांकडून शहरातील 62 हजार घरांमधील नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाचे रुग्ण शोधून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानुसार नगर शहरात ही मोहीम दोन टप्प्यांत राबविण्यात आली. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पार पडला. तर, दुसरा टप्पा 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आला. पहिल्या टप्प्याचा कालावधी 15 दिवसांचा तर दुसऱया टप्प्याचा कालावधी 10 दिवसांचा होता. आज (दि. 25) मोहिमेचा समारोप होणार आहे.

दरम्यान, नगर शहरातील प्रत्येक प्रभागात पथके तैनात करण्यात आली असून, पथकातील कर्मचाऱयांना घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले होते. या मोहिमेसाठी कर्मचाऱयांना ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले. कोरोना रुग्ण शोधून काढण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाधिक तपासण्या करून कोरोना रुग्ण शोधण्यात आले आहेत.

पहिल्या फेरीत शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दुसऱया फेरीत दि. 23 ऑक्टोबरअखेर 75 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. शहरात 85 हजार 429 घरे असून, 62 हजार घरांतील नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीतील सर्वेक्षणात बंद असलेले सुमारे दोन ते तीन हजार घरांचे पुन्हा सर्वेक्षण केले जात आहे. या मोहिमेत काही प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले, तर इतर आजारांचे प्रमाण 5 ते 6 टक्के दिसून आले.

– डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नगर मनपा.

आपली प्रतिक्रिया द्या