‘नगर अर्बन’ची आजची सभा वादळी ठरणार; बँकेवर परवाना रद्दची टांगती तलवार; विरोधी सभासदांचा आरोप

बनावट सोनेतारण घोटाळा, नियमबाह्य कर्जवाटप, रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँकेची उद्या होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरणार आहे. दरम्यान, वारंवार पत्रे, निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही संचालक मंडळाने वसुलीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आजही बँकेवर रिझर्व्ह बँकेची बंधने असून, वसुली न झाल्यास बँकेचा परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारून गैरव्यवहारास जबाबदार असणाऱया दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे. दरम्यान, ठेवीची रक्कम परत मिळवायची असेल, तर जागरूक सभासदांनी बँकेच्या 15 एप्रिलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून आपले हक्क कर्तव्य बजवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राजेंद्र चोपडा म्हणाले, ‘‘नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेची बंधने आहेत. वसुली झाली नाही, तर बँकेचा परवाना रद्द होण्याचीदेखील टांगती तलवार बँकेवर आहे. थकीत कर्ज रकमेची वसुली होऊन बँकेवरील निर्बंध शिथिल व्हावेत, अशीच सभासदांची इच्छा आहे; परंतु कोणत्याही प्रकारे कडक पद्धतीने वसुलीकडे आणि बँकेच्या हिताकडे लक्ष दिल्याचे अद्याप दिसून येत नाही. त्यामुळेच बँकेचा एनपीए आजही 65 टक्के आहे. या सर्व प्रकाराला संचालक मंडळ आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे 2014 ते 2019 या काळात प्रचंड गैरव्यवहार करून बँकेच्या हिताला बाधा पोहोचविणे व बँकेची आर्थिक परिस्थिती खालविण्यास जबाबदार धरून तत्कालीन संचालक मंडळ सदस्यांचे बँकेचे सभासदत्व रद्द करण्यासह विद्यमान सात संचालकांना संचालक पदावरून अपात्र ठरविण्यासाठी केंद्रीय निबंधकांच्या आदेशानुसार उद्या (दि. 15) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेला दाखविण्यासाठी म्हणून काही कर्जप्रकरणांमध्ये तारण मालमत्तांचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे; परंतु त्याचे पुढे काय करणार आणि कधी करणार? याबाबतचे धोरण किंवा नियोजन तसेच आजवर किती तारण मालमत्तांचे प्राथमिक, प्रतीकात्मक ताबे घेण्यात आले आहेत, त्यापैकी किती प्रकरणांचा निपटारा झाला? सिक्युरिटायझेशन ऍक्टनुसार किती तारण मालमत्तांचे ताबे घेण्यात आलेले आहेत, त्या मालमत्तांचे लिलाव कधी करण्यात येणार आहेत? याबाबत सर्व सभासदांना या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये माहिती देण्याची मागणी चोपडा यांनी केली आहे.

पाच लाखांपेक्षा जास्तीच्या ठेवी परत मिळण्याची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केली – अशोक कटारिया

नगर अर्बन बँकेत पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांची 1 हजार 236 इतकी संख्या आहे. त्यांच्या ठेवी 214 कोटींच्या आहेत. पाच लाखांपर्यंतच्या ठेवी डीआयसीजीसीमार्फत परत केल्यानंतर पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या ठेवींच्या रकमा त्यांना परत मिळण्याबाबतची मागणी अर्बन बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी दिली. ठेवीदारांच्या हक्काचे पैसे त्यांना वेळेत मिळावेत, यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा ठराव संचालक मंडळाने मंजूर केला असून, उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवीतून बँकेकडे गहाण असलेल्या मालमत्तासंबंधी लिलावात भाग घेऊन मालमत्ता विकत घेता यावी, याबाबतही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.