नगर शहरात 19 ठिकाणी विसर्जन कुंड

गणेश विसर्जनासाठी पोलीस व नगर मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर, गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मनपा प्रशासनाकडून 19 ठिकाणी विसर्जन कुंड करण्यात आले आहेत. लाडक्या बाप्पांना उद्या निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी गणेश भक्तांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदाही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीस परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मिरवणुकीविनाच गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. दि. 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात झाली होती. नगर शहर व उपनगरात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शहरात काही मोजक्याच सार्वजनिक गणेश मंडळांकडून बाप्पांची स्थापना करण्यात आली. तर, घरोघरी सर्वत्र बाप्पा विराजमान झाले. उद्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. विसर्जनावेळी मिरवणूक निघणार नाही, तसेच गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे.

मनपा प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुंड करण्यात आले आहेत. दरम्यान, शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात उद्या सकाळी प्रथेप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते आरती होणार असून, सायंकाळी घरगुती पद्धतीने गणरायांचे विसर्जन केले जाणार आहे.

विशाल गणेश मंदिरात महाआरती

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात गेल्या दहा दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या नियमांचे पालन करीत गणेश याग, अथर्वशीर्ष पठण आदींसह विविध कार्यक्रम पार पडले. मानाच्या विशाल गणपतीची महाआरती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता होणार असून, मिरवणुकीस बंदी असल्यामुळे सायंकाळी घरगुती पद्धतीने गणरायाचे विसर्जन केले जाणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांनी सांगितले.

कृत्रिम विसर्जन कुंड असणारी ठिकाणे

गांधी रोड, भारत बेकरी चौक (बोल्हेगाव), वडगाव गुप्ता रोड, मयूर कॉर्नर चौक, तपोवन रोड – नाना चौक, निर्मलनगर साईबाबा मंदिराजवळ, पाईपलाईन रोड यशोदानगर विहीर, महालक्ष्मी उद्यानाजवळ बालिकाश्रम रोड, गंगा उद्यान मिस्किन मळा, कल्याण रोड बाळाजी बुवा विहीर, कल्याण रोड, सीना नदीपात्र, सारसनगर पुलाशेजारी, साईनगर उद्यान बुरुडगाव रोड, लिंक रोड, क्रांती चौकाजवळ, मोतीनगर बुद्धविहारशेजारी केडगाव, केडगाव देवी मंदिरासमोरील जागा, मधुर मंगल कार्यालयाशेजारी केडगाव, गोविंदपुरा मारुती मंदिराजवळ मुकुंदनगर, दाणेडबरा पटांगण, मार्केट यार्डसमोरील पांजरापोळ संस्था पटांगण.

आपली प्रतिक्रिया द्या