पावसाळ्यात उद्भवणारे डेंग्यू, चिकुनगुनिया, गोचीड ताप आदी आजार रोखण्यासाठी ‘एक तास स्वच्छतेसाठी’ ही मोहीम महापालिकेने सुरू केली होती. त्यानुसार दर रविवारी एक तास आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्या साप्ताहिक स्वच्छता मोहिमेत पाचव्या आठवडय़ातही नगरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहर स्वच्छ ठेवण्यामुळे विविध आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
डेंग्यू जनजागृती मोहिमेच्या पाचव्या आठवडय़ात सावेडी उपनगरातील श्रीराम चौक-पाईपलाईन रोड ते नगर-मनमाड रोड या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका दीपाली बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, तायगा शिंदे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यासह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. या मोहिमेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढणे, रस्ता दुभाजकाजवळील माती संकलित करणे, दुभाजकात वाढलेले गवत काढून घेणे, संकलित झालेला सर्व कचरा, दगडे, माती आदी कचरा डेपोमध्ये नेऊन टाकणे, अशा स्वरूपाची कामे करण्यात आली.
विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी एक जनजागृती मोहीम सुरू केली होती. यातून उपयुक्त माहिती मिळाल्यामुळे नगरकरांमध्ये सतर्कता निर्माण झाली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे माजी नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी यावेळी सांगितले.