नगर महापालिका पोटनिवडणूक, प्रभाग 9 मध्ये घुसविलेली ‘ती’ 1200 नावे वगळली

प्रातिनिधिक फोटो

शिवद्रोही श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द झाल्याने मनपाच्या प्रभाग 9 (क) ची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मनपा प्रशासनाने आज अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली 1 हजार 200 नावे अंतिम मतदारयादीत वगळण्यात आली आहेत. प्रभाग 8 मधील ही नावे प्रभाग 9च्या मतदारयादीत घुसविल्याची हरकत मनपाकडे करण्यात आली होती. या हरकतीनुसार सदर नावे वगळण्यात आली. अंतिम मतदार यादीमध्ये 9 हजार 148 पुरुष, तर 9 हजार 91 महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, आगामी महापौरपदाच्या दृष्टीने या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. उपमहापौरपदावर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने त्याचे नगरसेवकपद रद्द केले. छिंदमने या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो विजयी झाला होता.

प्रभाग 9 (क) ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. आगामी महापौरपदाच्या दृष्टीने या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पोटनिवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मनपाने 19 हजार 554 मतदारसंख्या असलेली ही प्रारूप मतदार यादी जाहीर केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यासाठी 15 जानेवारी 2021ची विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत मनपा प्रशासनाकडे दोन हरकती प्राप्त झाल्या होत्या. प्रभाग 8 मधील 1 हजार 200 नावे प्रभाग 9 च्या मतदार यादीत समाविष्ट केल्याच्या एका हरकतीचा त्यामध्ये समावेश होता.

23 फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. त्यानंतर आज (दि.3)अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. मनपाने प्रारूप मतदार यादीतील या 1 हजार 200 नावांसह अन्य काही नावे सदर मतदार यादीतून वगळली आहेत. 18 हजार 239 मतदारसंख्या असलेली अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच मनपा मुख्यालय व सावेडी, माळीवाडा, झेंडीगेट, केडगाव- बुरुडगाव प्रभाग कार्यालय येथे डकविण्यात आली आहे. डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागात एकूण 17 हजार 533 मतदार होते.

दोन वर्षांत 706 नवे मतदार

– प्रभाग क्र. 9ची 18 हजार 239 मतदारसंख्या असलेली अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहेत. यात 9 हजार 148 पुरुष, तर 9 हजार 91 महिला मतदारांचा समावेश आहे. डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागात 17 हजार 533 मतदार होते. गत दोन वर्षांत प्रभाग 9 मध्ये 706 मतदार वाढले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या