नगर जिल्ह्यात 80 टक्के मतदान, हिवरे बाजारमध्ये 25 वर्षांनंतर मतदान

नगर जिह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. जिह्यात 80 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, किरकोळ प्रकार वगळता इतरत्र मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार येथे बिनविरोधची परंपरा खंडित झाल्यामुळे राज्याचे लक्ष नगर जिह्याकडे लागले आहे.

अकोले तालुक्यातील 36,  संगमनेर 90, कोपरगाव  29, श्रीरामपूर 26, राहाता 19, राहुरी 44,  नेवासा 52, नगर 56, पारनेर 79, पाथर्डी 75,  शेवगाव 48, कर्जत 54, जामखेड 39 आणि श्रीगोंद्यातील 58 अशा जिह्यातील 705  ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडले. पाच हजार 788  जागांसाठी  13 हजार 194  उमेदवार निवडणूक  रिंगणात आहेत.  त्यासाठी 14 लाख 40 हजार 929 मतदार होते.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेसाठी दीड हजार कर्मचारी, तर साडेतीन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

नगर तालुक्यातील डोंगरगणमध्ये सकाळीच मतदान प्रकिया शांततेत सुरू झाली. गणपतराव मते-पाटील विद्यालयातील मुख्याध्यापक अजय भूतकर हे वृद्ध आईला मतदान करण्यासाठी घेऊन आले. आईला चालता येत नसल्याने भूतकर यांनी गाडी गेटच्या आत आणली. या कारणावरून भूतकर व सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्यात शाब्दिक वाद झाले. मात्र, बोरसे यांनी भूतकर यांना मारहाण केली. यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. दोन तासांनंतर बोरसे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. नगर तालुक्यातीलच शिंगवे येथे सकाळी दोन वेळा मतदानयंत्र बंद पडले होते. त्यामुळे सुमारे तासभर मतदान प्रक्रिया थांबली होती.

पारनेर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी अंदाजे 85 टक्के मतदान झाले. कळस येथे एका मतदान केंद्रावर ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाला. सकाळी 10नंतर दुसरे मशिन बसविल्यानंतर तेथे मतदान प्रक्रिया सुरू झाली. सुपे येथे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर नारळ फोडण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी मज्जाव करूनही नारळ फोडण्यात आल्याने सबंधितांवर कारवाई करण्यात आली. राहुरी तालुक्यातील 44  ग्रामपंचायतींच्या 360 जागांच्या निवडीसाठी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 79.86 टक्के मतदान झाले. कोपरगाव तालुक्यात 82.18 टक्के, तर राहाता तालुक्यात 78 टक्के मतदान झाले.

हिवरे बाजारमध्ये 25 वर्षांनंतर मतदान

नगर तालुक्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणूक 25 वर्षांपासून बिनविरोध होत होती; परंतु यंदा या ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. हिवरे बाजारमध्ये दुपारपर्यंत 60 टक्के मतदान झाले होते. ‘पद्मश्री’ पोपटराव पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजाविला. ‘राज्य आदर्श गाव योजने’चे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पोपटराव पवार यांचे हे गाव आहे. 25 वर्षांपासून पोपटराव पवार यांचा गावावर एकहाती असलेला अंमल पुन्हा कायम राहणार असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात असले, तरी विरोधक निवडणुकीत काय किमया करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजाविला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजाविला. राळेगणसिद्धीत सात जागांवर निवडणूक होत असून, दोन राजकीय गटांचे एक पॅनेल, तर तरुणांच्या पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. राळेगणसिद्धी परिवार कोणाच्या हाती गावची सत्ता देतो, याकडे तालुक्याचे लक्ष आहे.

महिला मतदाराला उमेदवाराकडून धक्काबुक्की

वृद्ध महिलेला मतदानासाठी घेऊन गेल्याच्या रागातून तालुक्यातील किन्ही येथे कांचन शिवाजी मुळे (वय 42, रा. किन्ही) या महिलेला ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार हरेराम आत्माराम खोडदे या उमेदवाराने धक्काबुक्की करून ढकलून दिले. याप्रकरणी पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या