नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा

नगर जिह्यातील 705 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. तालुक्याच्या ठिकाणी आज सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत सत्तांतर घडविले. नगर जिह्यामध्ये महाविकास आघाडीचा वरचष्मा सर्वत्र पाहायला मिळत आहे.

शुक्रवार (दि. 15) रोजी ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. सरासरी 72 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. सर्वच मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्ते व समर्थकांकडून गुलाल उधळून जल्लोष केला जात होता. जिह्यातील अकोले तालुक्यातील 36 ग्रामपंचायती, संगमनेर 90, कोपरगाव 29, श्रीरामपूर 26, राहाता 19, राहुरी 44, नेवासा 52, नगर 56, पारनेर 79, पाथर्डी 75 आणि शेवगाव तालुक्यातील 58 ग्रामंपचायतींचे निकाल आज जाहीर झाले. जिह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. काही ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे घटकपक्ष भाजपबरोबर गेले होते, तर काही गावांमध्ये भाजपचा गट महाविकास आघाडीबरोबर राहिला. त्यामुळे जिह्यात संमिश्र निकाल लागल्याचे दिसत आहे.

विखेंच्या मतदारसंघात थोरातांची बाजी

संगमनेर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 94 ग्रामपंचायतींवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, विखेंच्या कार्यक्षेत्रातही बाजी मारली आहे. विखे यांच्या मतदारसंघात असलेल्या झरेकाठी, चणेगाव, चिंचपूर, ओझर बु., शेडगाव, पानोडी या गावांमध्ये मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी बाजी मारून या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असून, कनोली, औरंगपूर, मनोली येथेही कडवी झुंज देत निर्णायक जागा मिळविल्या आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील चार गावांत सत्तांतर

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान, बेलापूर बु. पढेगाव मातुलठाण या चार गावांत ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले. मतदारसंघ आरक्षित झाल्याने नेत्यांची गावाबरोबरची नाळ तुटली. गावागावांत विचित्र आघाडय़ा झाल्या. आमदार राधाकृष्ण विखे यांनी रसद पुरविली, पण मतदारांनी विखे यांना नाकारले. त्यामुळे अनेक मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक गावांत नवीन चेहरे निवडून आले. ब्राह्मणगाव वेताळ, नायगाव, मांडवे, कुरणपूर, एकलहरे, लाडगाव, गळनिंब, महांकाळ वडगाव, घुमनदेव, वळदगाव, मातापूर, सराला, गोवर्धनपूर भेर्डापूर, गोंडेगाव, मालुंजा, खोकर, मुठेवाडगाव, कारेगाव, निपाणी वडगाव, बेलापूर खु., वडाळा महादेव या गावांत नवीन सदस्य निवडून आले आहेत.

कोपरगाव तालुक्यात कोल्हे गटाचेच वर्चस्व

कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर झाले असून, यात 20 ग्रामपंचायती कोल्हे गटाकडे, 6 ग्रामपंचायती काळे गटाकडे व कोकमठाण ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे, तर प्रत्येकी एक -एक ग्रामपंचायत परजणे व जाधव गटाकडे गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षांनंतर काळे गटाकडे असलेल्या मळेगाव थडी, रवंदे, वेळापूर, नाटेगाव, कासली पाच ग्रामपंचायतींत कोल्हे गटाने सत्तांतर घडवून आणले आहे, तर कोल्हे गटाच्या ताब्यात असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायतींत महाविकास आघाडीने व हिंगणी ग्रामपंचायत काळे गटाने आपल्याकडे खेचून आणल्याने याठिकाणी सत्तांतर झाले आहे. संवत्सर ग्रामपंचायत राखण्यात परजणे गटाला यश आले असले, तरी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत तीन जागा त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. यात कोल्हे गटाने दोन जागा व काळे यांनी एक जागा पटकावली आहे. सांगवी भुसार ग्रामपंचायतीच्या 9 जागांपैकी राजेंद्र जाधव यांनी सहा जागा बिनविरोध घडवून आणल्याने आपल्याकडे राखण्यात यश मिळविले, तर निवडणूक झालेल्या उर्वरित तीन जागांपैकी गटाने दोन जागा कोल्हे गटाने व एक जागा काळे गटाने पटकावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या