श्रीरामपुरात प्रेमप्रकरणातून गोळीबार; एकजण जखमी

एका युवकासोबत ब्रेकअप झालेल्या मुलीचे दुसऱया युवकासोबत प्रेम जडल्याने या दोन्ही युवकांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन गोळीबारात झाल्याची घटना श्रीरामपुरात घडली आहे. यात एकजण जखमी झाला असून, पोलिसांनी गोळीबार करणाऱया दोघांना अटक केली आहे.

शुभम राजू जवळकर (वय 23, रा. दुर्गानगर सूतगिरणी) असे जखमीचे नाव असून, पोलिसांनी शुभम यादव (वय 18, रा. स्मशानभूमीजवळ, श्रीरामपूर) आणि मयूर तावर या दोघांना अटक केली आहे.

शुभम जवळकर याचे एका मुलीवर प्रेम होते, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर या मुलीसोबत शुभम यादव याचे प्रेम जडले होते. यावरून या दोघांत यापूर्वी वाद झालेले होते. सोमवारी रात्री 11च्या सुमारास दुर्गानगर सूतगिरणी येथे शुभम जवळकरवर शुभम यादवने साथीदारासह येत पिस्टलने गोळी झाडली. यात जवळकरच्या छातीवर जखम झाली.

पोलीस निरीक्षक संजय सानप, सहायक निरीक्षक संभाजी पाटील, दत्तात्रय उजे, बिरप्पा करमल, किशोर जाधव, राहुल नरवडे, पंकज गोसावी, रघुनाथ कारखेले यांनी आरोपी यादव व मयूर तावर यांना ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या