त्यांनी ठरवलं आणि करुनही दाखवलं, चर्चा फक्त नगर जिल्ह्यातील अनोख्या विवाहाची

37750

विवाह सोहळ्यातील पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देत नगर जिल्ह्यातील लोणी येथे महिलांनी एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पाडून दाखवला. ‘त्यांनी ठरवलं आणि त्यांनी करून दाखवलं’ असेच उद्गार यावेळी सर्वांच्या मुखातून बाहेर पडत होते. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जबाबदारी महिलांनी उचलली आणि हा विवाह इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरला. लग्न पत्रिकेपासून ते विवाहाच्या पौराहित्यापर्यंत सर्व काही महिलांनीच केले. राहता तालुक्यातील लोणी येथे गुरुवारी हा विवाह सोहळा पार पडला

लग्न समारंभ म्हटलं की पुरूष ठरवतील तसेच व्हायचे, मात्र लोणी येथील हा विवाह सोहळा यास अपवाद ठरला आहे. लोणी प्रवरानगर येथील म्हस्के कुटुंबातील संचिता आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी गावातील गायकवाड कुटुंबातील अनिकेत यांचा विवाह गुरूवारी संध्याकाळी पार पडला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देत पुरूषप्रधान संस्कृतीला बाजूला करत महिलांनी विवाह समारंभाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतापासून ते नवरी-नवरदेवाच्या मागे उभ्या राहणाऱ्या मामाची जागाही मामींनी भरून काढली. अंतरपाठ धरायलाही महिलाच, निवेदकही महिलाच आणि लग्न लावायलाही महिलाच. अगदी सगळ्याच जबाबदा-या महिलांनी पार पाडल्यात. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना अशा समारंभातही बरोबरीची जागा मिळावी हा उद्देश यामागे असल्याचं या लग्न समारंभातील महिलांनी सांगितले.

लोणी येथील उषा कैलास म्हस्के यांची कन्या वधू तर आश्वी तालुका संगमनेर येथील हिराबाई दिनकर गायकवाड यांचे चिरंजिव यांचा हा विवाह आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला. लग्न पत्रिकेत महिलांनाच प्राधान्य देण्यात आले. तसेच प्रेक्षकापासून कार्यवाहक, स्वागतोत्सुक, निमंत्रक संयोजक, व्यवस्थापक सर्व जागी पुरूषांऐवजी महिलाच दिसल्या. सर्व कामेही त्यांनीच पार पाडली. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी महिलांनीही मनसोक्त पुढाकार घेत आम्ही महिला पण कुठे कमी नसल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी खास प्रमुख उपस्थिती असलेल्या जि.प.च्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे यांनी या महिलांचे कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या