
कोटय़वधी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी नगर महापालिका प्रशासन आक्रमक झाले आहे. मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी आदेश दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून अनेक मालमत्ता सील करण्यात आल्या असून, अनेक ठिकाणी नळजोड तोडण्यात आले आहेत.
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत कराच्या वसुलीसाठी सोमवारपासून महापालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी मोबाईल टॉवरसह चार मालमत्तांना सील ठोकण्यात आले. तसेच 12 मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन तोडून पाणीपुरवठा बंद केला. माळीवाडा प्रभाग कार्यालयाने भारत संचार निगम (एस. एम. खाजगीवाले, रा. ख्रिस्त गल्ली) यांच्याकडील 2.09 लाख, सेंच्युरी इन्फ्रा टेली लि. (एस. एम. खाजगीवाले, रा. ख्रिस्त गल्ली) यांच्याकडील 9.39 लाख, सेंच्युरी इन्फ्रा टेली लि. (काशिनाथ सावळेराम, रघुनाथ दारुणकर, रा. तेलीखुंट) यांच्याकडील 3.33 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांच्या मालमत्ता सील केल्या.
नगर महानगरपालिकेची मालमत्ता कराची थकबाकी आता जवळपास 300 कोटींच्या घरात गेली आहे. मध्यंतरी शास्तीमध्ये 75 टक्के सवलत देण्यात आली होती. महापालिकेची सरासरी वसुली 40 कोटींच्या आसपास आहे, तर नेहमीची बिले 65 कोटींपर्यंत जातात. त्यामुळे मालमत्ता कराची 70 टक्के वसुली दरवर्षी होत असते. उर्वरित रक्कम थकीत राहते. त्यामुळे आयुक्त पंकज जावळे यांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. बजेट मंजुरीनंतर सोमवारी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. यामध्येही थकबाकीचा विषय गाजणार आहे.