नगर शहरातील सर्व कचऱयाचे वेळेतच संकलन होणार; महापालिका घंटागाडय़ांना बसविणार ‘जीपीएस’ सिस्टीम

नगर महानगरपालिका घनकचरा विभागाच्या वतीने शहरातील कचरा घरोघरी जाऊन घंटागाडय़ांद्वारे कचऱयाचे संकलन केले जात आहे. घंटागाडी आता शहरामध्ये ठरलेल्या मार्गाप्रमाणे व दिलेल्या वेळेत जाण्यासाठी घंटागाडय़ांना जीपीएस सिस्टीम लावली जाणार आहे. या माध्यमातून शंभर टक्के कचरा संकलन केले जाईल. यात कामचुकारपणा केल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. घनकचरा विभागातील कामाबाबत पारदर्शकता आणण्यासाठी जीपीएसची माहिती अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांना दिली आहे. या कामासाठी लवकरच खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केली.

आयुक्त डॉ.  पंकज जावळे यांनी महापालिका घनकचरा विभागाची बैठक घेतली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरामध्ये घंटागाडय़ा नियमित व वेळेवर घरोघरी जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. आपले शहर शंभर टक्के कचराकुंडीमुक्त आहे. कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा टाकावा, असे आवाहन घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख यांनी केले.

नगर शहरात रोज साधारणतः 130 टन कचरा होत असतो. हा कचरा बुरूडगाव डेपोत आणून तेथे कचऱयापासून खत निर्मितीचा प्रकल्प राबवला जात आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार ज्या महानगरपालिका चांगल्या पद्धतीने कचरा संकलन करतील त्यांना योग्य ते पारितोषक किंवा रँकिंग दिली जाते. नगरच्या महापालिकेलाही असे पुरस्कार मिळाले आहेत. मध्यंतरी शहरातील कचरा पूर्ण क्षमतेने गोळा केला जात नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. याशिवाय कोरोनाकाळात लॉकडाऊन असतानाही मोठय़ा प्रमाणात कचरा उचलल्याचे दाखवून बिले काढण्यात आली होती. याबाबत पूर्वीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू आहे. नुकतेच महापालिकेने घनकचरा संकलनासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कचरा संकलन करण्याच्या दृष्टिकोनातून मनपा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. योग्य पद्धतीने कचरा उचलून तो त्याची वेळेत विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत.

शहरातील अनेक भागांमध्ये आजही कचऱयाचे संकलन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक घंटागाडय़ा नियोजित मार्गावर न राहता भलतीकडेच फिरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात कचऱयाचे साम्राज्य दिसून येते. याबाबत नागरिकांसह अनेक संस्थांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने आता या घंटागाडय़ांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील कचऱयाची समस्या सुटण्याचा विश्वास आयुक्त डॉ. जावळे यांनी व्यक्त केला आहे.