एमबीए प्रवेश पात्रता परीक्षेला 5 तास उशीर, सकाळी नऊचा पेपर सुरू झाला दुपारी दोनला; परीक्षार्थींना मनस्ताप

एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी प्रवेश पात्रता परीक्षा परीक्षेचे नियोजन करणाऱ्या खासगी कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तब्बल पाच तास उशिराने सुरू झाली. सकाळी नऊचा पेपर दुपारी दोन वाजता सुरू झाल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, संतप्त विद्यार्थ्यांच्या रोषाला कर्जुले हर्या येथील राजीव गांधी विद्यालयाच्या प्रशासनास नाहक सामोरे जावे लागले. मात्र विद्यालयाचे सचिव किरण आहेर यांनी मध्यस्थी करीत या गोंधळातून मार्ग काढला.

एमबीएची प्रवेश पात्रता परीक्षा शनिवारी सकाळी नऊ वाजता कर्जुले हर्या येथील राजीव गांधी विद्यालयात घेण्यात येणार होती. या परीक्षेचे नियोजन करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी मात्र वेळेत न पोहचल्याने विद्यालयात शेवगांव, श्रीरामपूर, लोणीप्रवरा, राहता, संगमनेर व नगर येथून आलेले 200 विद्यार्थी गोंधळात पडले. परीक्षेची वेळ झाली तरी तेथे कोणीही हजर नसल्याने करायचे काय असा प्रश्‍न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रशासनास धारेवर धरले. प्रकरण चिघळू लागल्याने तेथे पोलिसांनाही पाचारण करावे लागले. या विद्यालयाने परीक्षेसाठी केवळ वर्ग आणि संगणक उपलब्ध करून द्यायचे होते. उर्वरीत सर्व प्रक्रिया बेंगलोर येथील अ‍ॅक्सेस इन्फ्रा ही कंपनी राबविणार होती.

परीक्षेचे नियोजन करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आदल्या दिवशी विद्यालयात येऊन केंद्राची पाहणी करून गेले. शनिवारी कंपनीचे कर्मचारी परीक्षेसाठी येतील त्यांना संगणक उपलब्ध करून द्यावेत असे सांगण्यात आले होते. केवळ संगणक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असल्याने या परीक्षेबाबत या विद्यालयाच्या शिक्षकांना काहीही माहिती नव्हती. अखेर कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर कर्मचारी परीक्षा केंद्रावर दाखल झाले. त्यानंतर दुपारी दोन वाजता परीक्षेस सुरूवात झाली.परिक्षार्थीच्या दुसऱ्या बॅचची परीक्षाही उशिरा सुरू झाली.