नगरचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली

नगर जिल्हा प्रशासनात सोमवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. बी. भोसले यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची यापूर्वीच मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आज कोकण अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. एस. क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिह्यात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली होती. महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असताना नगर शहरातील अतिक्रमणाचा विषयही त्यांनी गांभीर्याने हाताळला होता. दरम्यान, नूतन जिल्हाधिकारी भोसले यांनी जिल्हाधिकारी म्हणून नगर येथे माझी नियुक्ती झाली असून, आदेश प्राप्त झाल्याचे सांगितले आहे.

दुसरीकडे नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आर. एस. क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी शिवराज पाटील यांची मुंबई येथे बदली झाली आहे. सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे नगर जिल्हा परिषदेचा प्रभारी पदभार होता. क्षीरसागर हे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त होते

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे येथे बदली झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या