नगर जिल्ह्यात आजपर्यंत 343.5 मि.मी. पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिह्यांतून नगरमध्ये येणाऱया नद्यांच्या व धरणांमधील पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नगर जिह्यातून वाहणाऱया गोदावरी, भीमा, प्रवरा, कुकडी व घोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
नगर जिह्यातील सरासरी पर्जन्याच्या 76.66 टक्के (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान झालेले आहे. आज दुपारी 12 वाजता जिह्यातील गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून 44 हजार 768 क्यूसेक, भीमा नदीत दौंड पूल येथून 74 हजार 456 क्यूसेक, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 27 हजार 114, निळवंडे धरणातून 21 हजार 855, ओझर बंधारा येथून 1 हजार 392 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे . कुकडी नदीत येडगाव धरणातून 7 हजार 500 क्यूसेक, घोड नदीत घोड धरणात 10 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
पुणे जिह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, खडकवासला व इतर धरणांतून विसर्ग सुरू आहे. पुणे जिह्यात पर्जन्यमान सुरू असून, दौंड पूल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. तरी नगर जिह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नाशिक जिह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तरी नगर जिह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यांतील गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारदरा पाणलोटात अतिवृष्टी
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून, प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ झाली आहे. तसेच निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून, संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. पर्यायाने ओझर बंधाऱयावरून प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यांतील प्रवरा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पुणे जिह्यात सुरू असलेल्या पर्जन्यामुळे येडगाव धरणातून कुकडी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील कुकडी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पुणे जिह्यातील धरणांतून सोडलेल्या विसर्गामुळे घोड धरणाची पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे घोड धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील घोडनदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.