नगर-सोलापूर महामार्गावर अपघात, ३ ठार

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

नगर-सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी फाटय़ाजवळ शनिवारी रात्री ट्रक व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नगर तालुक्यातील निंबळक येथील तीन उद्योजकांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. आत्माराम जयसिंग खरमाळे (वय ३०), भैरवनाथ कोंडिबा गायकवाड (वय ३५), जालिंदर लक्ष्मण भिलारे (वय ४०, सर्व रा. निंबळक) अशी मृतांची नावे आहेत. महेश कळसे हा गंभीर जखमी झाला आहे.

नगर-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री ११च्या सुमारास नगरहून कारमधून (एमएच-१६, बीएच-७११६) चारजण सोलापूरकडे निघाले होते. अंबिलवाडी फाटय़ाजवळ सोलापूरहून येणारा मालट्रक (केए-०१, सी-७४७१) व कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर साधारणतः एक ते दीड तास वाहतूक ठप्प पडल्यामुळे दुतर्फा मोठय़ा रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

अपघातात ठार झालेल्या आत्माराम खरमाळे व भैरवनाथ गायकवाड यांचा एमआयडीसीत हॉटेलचा व्यवसाय आहे; तर भिलारे यांचे एमआयडीसीमध्ये मोटार रिवायंडिंगचे युनिट आहे. खरमाळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील तर गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, चार बहिणी असा परिवार आहे.

आज निंबळक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. आज सकाळपासूनच गावक-यांनी आपले व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.

नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार डी. एस. गांगर्डे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या