नगर – प्रत्येक अनधिकृत गाळय़ामागे 35 लाख रूपये घशात घातले

गाळ्यांसाठी व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 40 लाख रुपये घेऊन त्यातील केवळ 5 लाख डिपॉझिट बाजार समितीत भरले. उर्वरित प्रत्येक अनधिकृत गाळ्यामागे 35 लाख रूपये घशात घातल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी नगर बाजार समितीतील सत्ताधाऱ्यांवर केला. काही दिवसांनी बाजार समिती विकणे आहे, असा फलक लावण्याची वेळ येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

नगर बाजार समितीमधील 68 अनधिकृत गाळ्यांसंदर्भात महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी कार्ले यांनी हा आरोप केला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, रामदास भोर, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, राजेंद्र भगत, मदन आढाव, शरद झोडगे, रवी वाकळे उपस्थित होते.

संदेश कार्ले म्हणाले, गाळ्यांसाठी व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 40 लाख रुपये घेतले आहेत. एवढी मोठी रक्कम बुडणार की काय? यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच एका व्यापाऱयाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाविकास आघाडी व्यापाऱयांचे नुकसान होऊ देणार नाही. बाजार समिती सत्ताधाऱ्यांनी खरेदी विक्री संघाच्या एका पदाधिकाऱ्याच्या दुकानाचे काऊंटर बाहेर फेकून देऊन जास्त पैसे देणाऱयाला तो गाळा दिल्याचेही कार्ले म्हणाले.

दिलीप सातपुते म्हणाले, 30 ते 35 वर्षांपासून शेतकऱ्यांचे बाजार समितीत अधिकृत गाळे आहेत. हे गाळे पाडण्याचे मनपा व बाजार समितीचे षडयंत्र आहे. बाजार समितीतील अनधिकृत गाळे आठ दिवसांत पाडण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले होते. कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल. गाळ्यांसंदर्भात रिवाईज प्लॅन दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, हा वेळकाढूपणा आहे, असे सातपुते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या