नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्य़ाकडून सहकाऱ्य़ाच्या आईचा विनयभंग

molestation-1

एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्य़ाच्या आईला पोलिसानेच अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना तोफखाना पोलीस ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी ‘जागतिक मातृ दिना’च्या दिवशीच असा प्रकार घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

रामदास जयराम सोनवणे (वय 32, पोलीस नाईक, तोफखाना) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनवणे याने त्याच्या मित्राच्या आईला गेल्या पाच दिवसांपासून अश्लील मेसेज पाठविले. संबंधित महिलाही या प्रकाराला वैतागून गेली होती. त्यामुळे तिने तिच्या मुलाला याबाबत माहिती दिली. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास ढुमे यांनी तोफखाना पोलिसांना खात्री करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तोफखान्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संबंधित महिलेला आलेले मेसेज, तसेच फोन रेकार्ंडग या सर्व बाबींची शहानिशा करून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी संबंधित पोलिसाला ताब्यात घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या