अहमदपूर तालुक्यावर मागील महिन्याभरापासून वरुणराजाची कृपादृष्टी पहायला मिळत आहे. दमदार पावसामुळे तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास सुटला आहे. तालुक्यातील 8 साठवण तलाव 100 भरले आहेत. यामुळे शेतकरी राजाही सुखावला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.
गतवर्षी थोट सावरगाव येथील तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस मोडीत काढला होता. तसेच शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न तीव्र झाला होता. पण गेल्या महिन्याभरा पासून संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सावरगाव थोट तलावस तांबट सांगवी, कोपरा, वैरागगड ढाळेगाव, हंगेवाडी , अंधोरी-2, येस्तार हे तलावही ओव्हरफ्लो झाले आहेत.
साठवण तलावामध्ये मावलगाव 55.28, खंडाळी 40.27, हगदळ गुगदळ 64.23, नागझरी 48.81, सोनखेड 56.00 ,धसवाडी 80.91, 44.43 ,कावळवाडी 81. 83, येलदरी 47.47, भावरा तांडा 80 टक्के इतका पाणीसाठा आहे. तालुक्यातील लघु पाटबंधारे मोघा 38.33 व थोडगा 33.09 टक्के एवढा पाणीसाठा आहे. 8 ऑगस्टपर्यंत झालेल्या साठवण्याची ही अधिकृत आकडेवारी आहे.
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात व तालुक्यातील उर्ध्व मनार उपसा प्रकल्प व मन्याड नदीपात्रात ही मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे मोठा पाणीसाठा झाला आहे. तालुक्यातील या पाणीसाठामुळे व मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे सारा व पाण्याचा प्रश्न मिटल्याचे चिन्ह दिसत आहे. मात्र सखल व हलक्या जमिनीत या झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याने पिके पिवळी पडत आहेत व कापसासारखे पिके उमळूनही जात आहेत. याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे.