इन्शाअल्लाह मोदी को सत्ता में नही आने देगें, ओवेसींचा फूत्कार

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

मोदी यांची पूर्वीसारखी लाट दिसून येत नाही. इस बार इंशाअल्लाह हम मोदी को सत्ता में आने नही देंगे. वंचित आघाडीमुळे सध्या आमचेच अच्छे दिन येणार असल्याची दर्पोक्ती एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज झालेल्या जबिंदा लान्स येथील सभेत केली. दरम्यान, वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीदेखील मोदी सरकारवर कडाडून टीका करीत एकटय़ा नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी शंभर कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यांनी आम्हाला हिशेब विचारण्याचा काय अधिकार असे बजावले.

एमआयएमचे लोकसभा उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी रात्री एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ओवेसी यांनी सांगितले की, देशभक्तीची भाषा करणाऱ्या मोदींनी मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी कशी दिली असा सवाल करत त्यांनी हीच का देशभक्ती असे म्हणत तोफ डागली. यापाठोपाठ ओवेसी यांनी राज्यात वंचित आघाडीचे सर्व उमेदवार हे मोठ्या फरकाने जिंकणार आहेत. मोदींना रोखण्यासाठी आम्ही ही आघाडी केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभेत ट्रिपल तलाकवर चर्चा सुरु असताना एकही खासदार माझ्या बाजूने बोलला नाही. संविधान वाचवण्यासाठी मी एकटाच लढलो. लोकसभेत दहा टक्के आरक्षणावर चर्चा सुरू असताना त्यावेळेसही मी एकटाच बोललो, अन्य पक्षाचे शंभर खासदार मूग गिळून गप्प होते. जर माझ्यासोबत प्रकाश आंबेडकर संसदेत आले तर आम्ही संविधानाचे रक्षण करू, असे सांगत त्यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर हे दोन्ही मतदार संघातून निवडून येणार असल्याची ग्वाहीही दिली.