बालाकोट एअरस्ट्राईक रात्रीच का करण्यात आला; हवाईदल प्रमुखांनी दिले उत्तर

2436

बालाकोट एअर स्ट्राईकबाबत हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव 2019’ च्या एका सत्रात ते सहभागी झाले होते. उत्तम तंत्रज्ञान असलेले देश रात्रीच्या वेळीच कारवाई करतात. आपल्याकडे उत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे बालकोट एअर स्ट्राईकची कारवाई रात्रीच्या वेळी करण्यात आली. यावेळी त्यांनी आखाती देशातील युद्धाचे उदाहरणही दिले. आखाती देशातील युद्धाची सुरुवातही रात्रीच झाली होती, असे त्यांनी सांगितले. रात्री कारवाई करणाऱ्या देशांकडे उत्तम तंत्रज्ञान असते. दिवसा कारवाई करणाऱ्या देशाकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसल्याने ते दिवसा कारवाई करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थानने रात्री हल्ला करून ते पळून गेले, असा आरोप पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानच्या या आरोपांना धनोआ यांनी उत्तर दिले आहे. पुलवामामध्ये दहशवादी हल्ल्याविरोधात कारवाई करताना हिंदुस्थानी हवाई दलाने बालाकोटमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे पाकिस्तानने केलेल्या आरोपांमध्ये तथ्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण पाकिस्तानला आव्हान दिले होते. मात्र, ते आपल्याला आव्हान देऊ शकले नाहीत, असेही ते म्हणाले. आपण आपले लक्ष्य साधण्यात यशस्वी झालो, ही मोठी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, या कारवाईत कोणती शस्त्रास्त्रे वापरली किंवा कारवाई कशी करण्यात आली, याबाबत अधिक माहिती देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या अण्वस्त्र हल्ल्यांबाबतही त्यांनी उत्तर दिले आहे. आपले सैन्यदल कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहे. मात्र, याबाबतचे निर्णय सरकार घेणार आहे. आम्ही नेहमी सतर्क असून कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला आमच्या क्षमता चांगल्याप्रकारे माहिती आहेत आणि जवानांच्या धाडसावर आमचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या