गोळीबार प्रकरण – आमदार सदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त, दादर पोलिसांची कारवाई

मी गोळीबार केलाच नाही असं सांगण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केले आहे. त्या पिस्तूलची न्याय वैधक तपासणी करण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे कारवाई करू, असे दादर पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनास्थळावर झाडलेल्या गोळीची पुंगळीदेखील पोलिसांना सापडली आहे.

गणपती विसर्जना दिवशी शुक्रवारी प्रभादेवी परिसरात शिवसेना व शिंदे गटात वाद झाला होता. विनाकारण वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या शिंदे गटाच्या चिथावणीखोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मग शिवसेना स्टाईलने चांगलाच इंगा दाखवला होता. हा वाद पोलीस ठाण्यात गेला असता त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांच्याकडील परवाना असलेल्या पिस्तुलातून जमिनीवर एक गोळी झाडली होती.

याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे, कुणाल वाडेकर यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आर्म्स अॅक्टचे कलमदेखील लावण्यात आले होते. त्या गुह्याच्या अनुषंगाने दादर पोलिसांनी सदा सरवणकरांनी गोळी झाडली ते पिस्तूल ताब्यात घेतले आहे. त्या पिस्तुलाची आता न्याय वैधक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येईल. मग तिथून जो अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी दादर पोलीस लवकरच सरवणकर पिता-पुत्र व ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अशांची चौकशी करणार आहेत.

दरम्यान, मी गोळी झाडलीच नाही असा सरवणकरांचा दावा आहे. मात्र पोलीस ठाणे आवारात पोलिसांना झाडलेल्या गोळीची पुंगळीदेखील मिळाल्याचे समजते. त्यामुळे मी गोळीबार केला नाही असे ठामपणे सांगणाऱ्या सदा सरवणकर यांच्या दाव्याचा लवकरच पर्दाफाश होईल असे बोलले जात आहे.