सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमाळतळावर आज अखेर पहिले विमान उतरले. दुपारी सवाबारा वाजता हवाई दलाच्या सी-295 या लढाऊ विमानाने ‘दक्षिण धावपट्टी 26’वर यशस्वी लॅण्डिंग केले. लॅण्डिंगची चाचणी यशस्वी होताच हवाई दलाच्या ‘सुखोई’ विमानाने विमानतळ परिसरात घिरटय़ा मारून मानवंदना दिली. सिडकोच्या अग्निशमन दलाने पाण्याचे उंच फवारे मारून लँडिंग झालेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे जोरदार स्वागत केले. यामुळे आता नवी मुंबईकरांचे हवाई सफरीचे स्वप्न लवकरच साकारणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमाळतळाच्या ‘दक्षिण धावपट्टी 26’चे काम पूर्ण झाले आहे. आज दक्षिण धावपट्टी 26 वर हवाई दलाच्या सी-295 या विमानाचे लॅण्डिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.
चाचणी नाही फक्त विमान उतरवले
सिग्नल, इंस्टुमेंटल लॅण्डिंग सिस्टीम, लायटिंग आणि रडार यंत्रणा या महत्त्वाच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर विमानाच्या लॅण्डिंगची चाचणी घेतली जाते. यापैकी सिग्नल आणि इंस्टुमेंटल लॅण्डिंग सिस्टीमची चाचणी पूर्ण झाली असली तरी अन्य चाचण्या बाकी आहेत. त्यामुळे आज लॅण्डिंगची चाचणी झालेली नाही. फक्त विमान उतरवण्यात आले, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीने गती दिली
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला गती मिळाली. सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रो आणि विमानतळाला गती देण्यासाठी प्रथम अडथळ्यांचा शोध घेतला. अडथळे दूर झाल्यानंतर सिडकोचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगात सुरू झाला. सध्या या विमानतळाची दक्षिण धावपट्टी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला देशांतर्गत प्रवासी सेवा या विमानतळावरून सुरू होणार आहे.
विमान गुजरातमधून आले
नवी मुंबई विमानतळावर लॅंिंण्डगची चाचणी करण्यासाठी आलेल्या हवाई दलाच्या विमानाने गुजरातमधील गांधीनगर येथून टेकऑफ केले होते. मानवंदना देण्यासाठी आलेले ‘सुखोई’ फायटर विमान हे हवाई दलाच्या पुणे येथील सेंटरमधून आले होते. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर अदानी समूह आणि सिडकोच्या अधिकाऱयांनी समाधान व्यक्त केले. या विमानतळाचे काम येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष अदानी समूहाने ठेवले आहे. त्यानंतर विमानतळ प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.