गाडीतल्या एअर फ्रेशनरचाही होऊ शकतो स्फोट! कसा? वाचा….

501

हल्ली बहुतांश गाड्यांमध्ये एसी आणि एअर फ्रेशनरची यंत्रणा असते. एसीमुळे काचा बंद असल्याने हवेत कुबट वास येऊ नये म्हणून एअर फ्रेशनरचा वापर आता सगळीकडेच केला जातो. पण, या एअर फ्रेशनरचा स्फोटही होऊ शकतो.

हो, हे खरं आहे. इंग्लंडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका माणसाच्या गाडीत एअर फ्रेशनरचा स्फोट झाला आहे. पण नशीबाने ड्रायव्हरचा जीव वाचला आहे. ही घटना 14 डिसेंबर रोजी घडली. वेस्ट यॉर्कशायरच्या हॅलिफॅक्समध्ये एका व्यक्तीने गाडीत एअर फ्रेशनर मारला आणि त्यानंतर त्याला सिगरेटची तल्लफ आली आणि त्याने सिगरेट पेटवली.

सिगरेट पेटवताक्षणी गाडीत एक जोरदार स्फोट झाला. स्फोटाने गाडीची विंडस्क्रीन आणि खिडक्यांचा चक्काचूर झाला. या स्फोटाचे हादरे आसपासच्या इमारतींनाही बसले. आसपासच्या गाड्यांच्या काचाही फुटल्या. सुदैवाने सिगरेट शिलगावणाऱ्या व्यक्तिला गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे गाडीत फवारण्यात येणाऱ्या एअर फ्रेशनरबाबत खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे. एअर फ्रेशनरमधील गॅस ज्वालाग्राही असतो. त्यामुळे एअर फ्रेशनर मारल्यानंतर लगेच सिगरेट किंवा तत्सम काहीही जाळू नका, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या