‘महाराजा’ची विक्री!

५० हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही. एअर इंडिया म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक होते. ‘महाराजा’ हे आमच्या वैभवाचे व आदरातिथ्याचे प्रतीक होते. ‘महाराजा’चे आधीच कोसळलेले संस्थान सरकारने खालसा केले आहे.

अखेर एअर इंडिया विकायला काढायचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही वेळ आधीच्या राज्यकर्त्यांनी आणली हे खरे, पण नवे सरकार येताच परिस्थिती सुधारेल असे वाटले होते. रेल्वेचे आणि एअर इंडियाचे खासगीकरण करणार नाही असे कालपर्यंत सांगितले जात होते, पण एअर इंडियाच्या ‘महाराजा’ला खांदा देण्याचे काम आमच्याच बादशाही सरकारने केले. काँग्रेस राजवटीत हा निर्णय झाला असता तर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस सरकारचे वस्त्रहरण केले असते. ज्यांना एअर इंडिया चालवता येत नाही ते देश काय चालविणार? असा सवाल केला असता, पण आज हिंदुस्थानची ‘National Carrier’ म्हणून ओळखली जाणारी एअर इंडिया विक्रीस काढण्यात आली आहे. एअर इंडियावर ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. शिवाय ४ हजार कोटींच्या व्याजाचे ओझे आहे. गेल्या दहा वर्षांपासून एअर इंडिया तोटय़ात आहे. त्यामुळे हा पांढरा हत्ती पोसायचा कशाला? असे देशाच्या अर्थमंत्र्यांना वाटते, पण एअर इंडियाची ही अशी घसरगुंडी का व कुणामुळे झाली, ‘महाराजा’स भिकारी करून रस्त्यावर आणणारे गुन्हेगार कोण याबाबत अर्थमंत्री काही बोलणार आहेत की नाही? एकेकाळी एअर इंडिया जगात सर्वोत्तम होती. ‘महाराजा’प्रमाणे एअर इंडियाचा थाटमाट होता, पण राजकारणी व नोकरशहांनी मिळून एअर इंडियाची वाट लावली. उधळपट्टी व गैरव्यवस्थापनामुळे आज ही वेळ आली आहे. विमान वाहतूक क्षेत्रातला एअर इंडियाचा वाटा ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत घसरला याचे कारण फायद्यात चालणारे अनेक ‘मार्ग’ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने खासगी विमान कंपन्यांना विकले. हा भ्रष्टाचार आहे. काँग्रेस राजवटीत हे पाप झाले असेल तर ते धुऊन काढण्याची संधी मोदी सरकारला होती. ते त्यांनी का केले नाही? की त्यांनाही उंटाच्या पाठीवर शेवटची काडी ठेवायचीच होती? राज्य बदलले म्हणून एअर इंडियाची हालत सुधारली नाही व ‘महाराजा’च्या ऐटीत भर पडली नाही. मुंबईतले एअर इंडियाचे मुख्यालय हलवून ते दिल्लीस नेले. तिथेच ‘महाराजा’च्या साम्राज्याचा पाया ढासळला. हे सर्व ठरवून केले व महाराजाला माती खायला लावून नोकरशहा व राज्यकर्त्यांनी आपले खिसे भरले. एअर इंडियाच्या कर्मचाऱयांत फूट पाडून फोडा-झोडा व राज्य करण्याची नीती एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने स्वीकारली. ५० हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही. एअर इंडिया म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक होते. ‘महाराजा’ हे आमच्या वैभवाचे व आदरातिथ्याचे प्रतीक होते. ‘महाराजा’चे आधीच कोसळलेले संस्थान सरकारने खालसा केले आहे.

पाऊस चांगला; पेरणी कमी

मान्सून महाराष्ट्रात चांगला सक्रिय झाला असला आणि हवामान खात्यानेही आतापर्यंत सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाल्याचे जाहीर केले असले तरी पेरण्या मात्र फक्त १८ टक्के क्षेत्रावरच होऊ शकल्या आहेत. त्यासाठी अर्थातच मान्सूनचा नेहमीच लहरीपणा कारणीभूत ठरला आहे. मान्सूनने यंदा अंदाज तसा चुकवला नसला तरी सर्वत्र सारखा न कोसळण्याचा शिरस्ता मात्र कायम ठेवला आहे. दोन दिवसांत कोकण, मुंबईसह बऱयाच भागांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. विदर्भ, नाशिक परिसरातही पावसाने जोरात बॅटिंग केली आहे. ठाणे जिल्हय़ात सरीवर सरी कोसळल्या. मात्र त्याचवेळी मराठवाडय़ाचा मोठा भाग आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरात अद्यापि जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या या ‘उन्नीस-बीस’मुळेच आतापर्यंतचा पाऊस ७७ टक्के, पण पेरण्या मात्र १८ टक्के अशी विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. नंदुरबारसारख्या जिह्यात तर १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने तब्बल ११ हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली कापूस लागवड अडचणीत आली आहे. पावसाने ओढ लावलेल्या इतर जिह्यांमधील पीक परिस्थिती थोडय़ाफार फरकाने यापेक्षा वेगळी नाही. राज्यात ऊसवगळता खरीप पिकाचे क्षेत्र सुमारे १४० लाख हेक्टर आहे. मात्र २३ जूनपर्यंत फक्त २५.६५ लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब इतकीच की पेरणी झालेल्या पिकांची उगवण समाधानकारक आहे. अर्थात यापुढे मात्र त्या भागात पावसाची गरज आहे. हवामान खात्याचे पुढील अंदाज खरे ठरो आणि सर्वत्र बरसण्याची ‘कृपा’ मान्सून करो. तरच पावसाचा टक्का चांगला, पण पेरणीचा कमी हे समीकरण बदलू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या