वैमानिक साठेंच्या प्रसंगावधानाने वाचवले 170 प्रवाशांचे प्राण

1261
अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक साठे

केरळ येथील कोझिकोडे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला तेव्हा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि अंधुक प्रकाश होता. या भयंकर परिस्थितीत वॅâप्टन वैमानिक दीपक वसंत साठे यांनी अत्यंत कुशलतेने प्रसंगावधान राखले. या अपघातात वैमानिक साठे यांचा मृत्यू झाला. मात्र, केवळ त्यांच्यामुळेच 170 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, कोझिकोडे विमानतळाबाबत 2011 मध्ये धोक्याचा इशारा दिला होता; पण हवाईदल मंत्रालयाने कोणतीही कारवाई केली नाही. देशातील किमान पाच विमानतळे ‘टेबल टॉप’वर असून, आता तरी प्रवाशांच्या जिवाशी खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.

केरळमधील कोझिकोडे येथील करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री 7.40 च्या सुमारास दुबईहून कालिकत येथे आलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धावपट्टीवरून विमान घसरले आणि अक्षरश: दोन तुकडे होऊन 35 पूâट दरीत कोसळले. वॅâप्टन वैमानिक साठे, सहवैमानिक अखिलेश कुमार यांच्यासह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. वंदेभारत मिशन अंतर्गत येणाऱ्या या विमानात 184 प्रवासी, दोन पायलट आणि चार क्रू मेंबर होते.

ब्लॅक बॉक्स सापडला
एअर इंडिया विमानाच्या एक्स्प्रेस फ्लाईटचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी अपघातस्थळी आज भेट देऊन पाहणी केली. पायलट-इन-कमांड दीपक वसंत साठे आणि को-पायलट अखिलेश कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 18 मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख, गंभीर जखमींना दोन लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत पुरी यांनी जाहीर केली. केरळ सरकारनेही मृत कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

जिगरबाज कॅप्टन साठे
एअर इंडिया विमानाचे वॅâप्टन दीपक वसंत साठे हे अत्यंत कुशल आणि अनुभवी वैमानिक होते. हवाई दलातील 21 वर्षांच्या सेवेनंतर विंग कमांडर म्हणून ते निवृत्त झाले होते. 58 वर्षांचे कॅप्टन साठे यांना 10 हजार तास उड्डाणाचा अनुभव होता. पुण्यातील ‘एनडीए’तून पास आऊट झालेले साठे सुवर्णदिपकाचे मानकरी होते. ‘स्वार्ड ऑफ ऑनर’चा पुरस्कार यांना मिळाला होता. हवाईदलात ते फायटर पायलट होते. निवृत्तीनंतर ते एअर इंडियाचे ग्रुप कॅप्टन म्हणून रुजू झाले होते. मूळचे नागपूरचे असलेले कॅप्टन साठे गेल्या 10 वर्षांपासून मुंबईत पवई येथे राहत होते. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

भावाने केली भावनिक पोस्ट; इंधन संपवले म्हणून विमानाला पेट घेऊ दिला नाही
दीपक साठे यांचे चुलत भाऊ निलेश साठे यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. दीपक साठे हे अनुभवी पायलट होते. कोझिकोडे येथे विमानाचे लँडिंग गिअर कार्यरत नव्हते. दीपक साठे यांनी विमानाच्या तीन फेऱ्या मारून इंधन संपविले. विमानात इंधन नसल्यामुळे अपघात झाल्यानंतरही विमानाने पेट घेतला नाही. विमान खाली उतरण्यासाठी इंजिन बंद करण्यात आले होते. विमान तीन वेळा आदळले. एवढा मोठा अपघात होऊनही विमानाने पेट घेतला नाही. दीपक साठे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे 170 प्रवाशांचे प्राण वाचले, असे निलेश साठे यांनी म्हटले आहे.

आठवड्यापूर्वीच आमचे फोनवर बोलणे झाले होते. आखाती देशातील आपल्या देशवासियांना परत आणण्यात अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले होते. नव्वद दशकाच्या सुरुवातीला हवाईदलात असताना अपघातातून दीपक बचावले होते. सहा महिने रुग्णालयात होते. पुन्हा उड्डाण घेतील, असे कोणालाही वाटले नव्हते; पण केवळ प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी उड्डाण घेतले, अशी आठवण निलेश साठे यांनी सांगितली आहे.

आईला वाढदिवसाची सरप्राईज भेट देणार होते, पण…
दीपक साठे यांच्या 83 वर्षीय आई नीला साठे आणि 87 वर्षीय वडील निवृत्त कर्नल वसंत साठे हे नागपुरात राहतात. आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. दीपक साठे हे वाढदिवशी आईला सरप्राईज भेट देणार होते; पण काळाने घाला घातला. एक दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला.

देशातील पाच विमानतळांवर मृत्यूच्या धावपट्ट्या
जमिनीपासून हजारो फूट उंचीवर ‘टेबल टॉप’वर बनविण्यात आलेले विमानतळ हे प्रवाशांच्या जिवाशी खेळ असल्याचे कालच्या अपघाताने समोर आले आहे.
मंगळुरू येथील ‘टेबल टॉप’ एअरपोर्टवर 2010 मध्ये अपघात झाला होता. विमान दरीत कोसळले होते.
देशातील किमान पाच ‘टेबल टॉप’ विमानतळे धोकादायक आहेत. त्यातील चार केरळमधील कोझिकोडे, कर्नाटकातील मंगळुरू, हिमाचल प्रदेशातील सिमला आणि सिक्कीमचे पँकाँग विमानतळ ऑपरेटमध्ये आहे.
‘टेबल टॉप’ विमानतळांवरील धावपट्टीची लांबी कमी असते. आजूबाजूचा स्पेसही कमी असतो. बाजूला दरी असते. अपघातानंतर विमान कोसळण्याची भीती असते.
कोझिकोडे विमान अपघातास ‘टेबल टॉप’ जबाबदार असल्याची माहिती पुढे आली आहे.

2011 मध्येच कोझिकोडे विमानतळावरील ऑपरेशन क्रिटीकल असल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले होते. केंद्र सरकारला अहवालही दिला होता. मात्र, अकरा वर्षांत नागरी उड्डाण मंत्रालयाने काहीही कारवाई केली नसल्याचे एअर इंडिया विमानाच्या कालच्या अपघातावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीही ‘डीजीसीए’ने या विमानतळाच्या धावपट्टीवर रबर जमा झाल्याचे सांगितले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या