एअर इंडियाचे संकट वाढले; 120 वैमांनिकांचा राजीनामा

851

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एअर इंडियाचे संकट आणखी वाढले आहे. कंपनीच्या 120 एअरबस ए-320 च्या वैमानिकांनी राजीनामा दिला आहे. 120 वैमानिकांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याने एअर इंडियासमोर हवाई फेऱ्या नियमित सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पदोन्नती आणि वेतनवाढ होत नसल्याने या वैमानिकांनी राजीनामा दिला आहे.

या वैमानिकांनी अनेकदा वेतनवाढ आणि पदोन्नतीची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे 120 वैमानिकांनी राजीनामा दिला आहे. आर्थिक संकटात असल्याने एअर इंडियाने 100 टक्के समभाग विकण्याची तयारी केली आहे. सरकारने एअर इंडियाचे 76 टक्के समभाग विकण्याची योजनाही तयार केली होती. मात्र, समभाग विकत घेण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. एअर इंडियावर 4500 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. या कर्जाचे हप्ते कंपनीने काही महिन्यांपासून अदा केलेले नाहीत. हे हप्ते भरण्यासाठी एअर इंडियाला 90 दिवसांचा क्रेडिट कालावधी मिळत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एअर इंडियाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला 300 कोटी रुपयांची तरतूद करावी लागते, असे कपंनीचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले. तेल कंपन्यांची थकीत रक्कम लवकरच अदा करण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही रक्कम अदा करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे वैमानिकांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कोणत्याही विमानफेऱ्या रद्द होऊ नये, तसेच प्रवाशांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यात तेल कंपन्यांनी एअर इंडियाला त्यांची थकीत रक्कम 18 ऑक्टोबरपर्यंत भरण्यास सांगितले आहे. ही रक्कम अदा केली नाही तर देशांतर्गत प्रमुख सहा विमानतळांवर एअर इंडियाचा इंधनपुरवठा थांबवण्यात येईल, असेही तेलकंपन्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एअर इंडियासमोरील संकट 120 वैमानिकांच्या राजीनाम्यामुळे आणखी वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या