एअर इंडियाच्या इमारतीला आग

सामना ऑनलाईन । मुंबई

नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाच्या इमारतीला मंगळवारी आग लागली. २२ व्या मजल्यावर लागलेली आग अग्नीशमन दलाने एक तासात विझवली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच, १० बंब घटनास्थळी रवाना झाले. रुग्णवाहिकाही एअर इंडियाजवळ पोहोचल्या. आग मोठी नसल्याने ती पसरली नाही. अन्यथा एअर इंडियाचे फार मोठे नुकसान झाले असते.

एअर इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे हलविण्यात आले आहे. सध्या या इमारतीच्या २१,२२ आणि २३ व्या मजल्यावर एअर इंडियाचे विभागीय कार्यालय आहे.