#Bangladesh एअर इंडियाच्या विमानाने हिंदुस्थानी दूतावासातील 190 कर्मचारी परतले, अजूनही 30 कर्मचारी ढाक्यातच

अराजक माजलेल्या बांगलादेशात अडकलेल्या हिंदुस्थानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले आहे. हिंदुस्थानी उच्चायुक्तालयातील 190 कर्मचारी बांगलादेशातून सुखरुप परतले आहेत. सुमारे 30 कर्मचारी अजूनही ढाकामध्येच आहेत.

खालिदा झिया यांचे पहिले छायाचित्र समोर आले

दरम्यान, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या अध्यक्षा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांनी पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची भेट घेतली. दरम्यान, बीएनपी सरचिटणीस यांनी पक्षाच्या सर्व स्तरातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने राजधानीतील एव्हरकेअर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खालिदा झिया यांचे अभिनंदन केले. खालिदा झिया यांची एक दिवस आधी 6 ऑगस्ट रोजी एका आदेशाद्वारे सुटका करण्यात आली होती.

अवामी लीगच्या 20 नेत्यांचे मृतदेह सापडले

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष असलेल्या अवामी लीगच्या नेत्यांवर हल्ले सुरूच आहेत. बांगलादेशातून अवामी लीगच्या आणखी 20 नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत. अनेक अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची आणि व्यावसायिक वास्तूंचीही तोडफोड आणि लुटमार होत आहे.