थकीत बिल भरा, तरच इंधन पुरवू! एअर इंडियाला तेल कंपन्यांचा 18 ऑक्टोबरचा ‘अल्टीमेटम’

310

60 हजार कोटींहून अधिक कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाला आता तेल कंपन्यांनी थकीत बिल भरण्यासाठी ‘अल्टीमेटम’ दिला आहे. थकलेल्या बिलाची रक्कम 18 ऑक्टोबरपूर्वी भरा, अन्यथा इंधन पुरवठाच बंद करू, असा निर्वाणीचा इशारा सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी एअर इंडियाला दिली आहे.

गेल्या काही महिन्यांत एअर इंडियाच्या डोक्यावरील कर्जाचा भार वाढतच चालला आहे. याचवेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल कंपन्यांनी थकीत बिल वसुलीसाठी पिच्छा पुरवला आहे. याच कारणावरून 22 ऑगस्टला सहा देशांतर्गत विमानतळांवर एअर इंडियाचा इंधनपुरवठा बंद करण्यात आला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यानंतर 7 सप्टेंबरपासून इंधन पुरवठा पूर्ववत झाला होता. त्यानंतर पुन्हा 11 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. तीही पाळली न गेल्यामुळे तेल कंपन्यांनी आता आक्रमक होऊन एअर इंडियाला 18 ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे.

कर्म ‘महाराजा’चे, फटका ’प्रजेला’!

एअर इंडिया अर्थात ‘महाराजा’च्या कर्जाचा विचार करता इंधनाचे थकीत पैसे 18 ऑक्टोबरपर्यंत भरले जातील का? याबाबत शंकाच आहे. त्यामुळे इंधन पुरवठा खंडित होऊन ‘महाराजा’ची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या