एअर इंडियाचे विमान बंद धावपट्टीवर उतरवले, सुदैवाने 136 प्रवासी सुखरूप

सामना ऑनलाईन । माले

केरळच्या थिरुवनंतपुरम येथून मालदीवकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान मालदीवच्या माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद असलेल्या धावपट्टीवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. मात्र विमान सुरक्षितरीत्या उतरल्याने या विमानातील 136 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या विमानाचे दोन टायर फुटले असून विमानाला ट्रक्टरने ओढून पार्किंगमध्ये लावण्यात आले. एअर इंडियाच्या माहितीनुसार ए 1263 हे विमान चुकीचा संदेश मिळाल्याने माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांधकाम सुरू असलेल्या धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे 130 प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णतः सुरक्षित आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महिनाभरातील दुसरी चूक
गेल्या महिनाभरातील हिंदुस्थानी विमान कंपन्यांच्या वैमानिकांची ही दुसरी चूक आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर जेट एअरवेजच्या वैमानिकाने विमान धावपट्टीवर न उतरवता शेजारच्या टॅक्सीसाठीच्या रस्त्यावर उतरवले होते. सुदैवाने त्यावेळीही विमानातील 150 प्रवासी कोणतीही इजा न होता बचावले होते.