Air India च्या खासगीकरणासाठी केंद्राचे निवेदन पत्र, 17 मार्चपर्यंत बोली लागणार

416
air-india

केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या दृष्टीने पावलं उचलली असून 100 टक्के भागीदारी विकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ची 100 टक्के भागीदारी काढून घेण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आधीपासूनच मोठा विरोध होत असताना देखील एअर इंडियाच्या खासगीकरणावर सरकारचा जोर आहे. सोमवारी यासंदर्भातील प्राथमिक माहिती देणारे निवेदन पत्र जारी करण्यात आले आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेले लिलावाचे दस्तऐवजांनुसार एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के भागीदारी विक्रीसाठी काढण्यात येणार आहे. याशिवाय एअर इंजिया आणि SATS ची जॉइंट वेंचर कंपनी AISATS मध्ये एअर इंडियाची 50 टक्के भागीदारी विक्रीसाठी काढण्यात येणार आहे. यावेळी बोली जिंकणाऱ्या कंपनीला एअर इंडियाचा मॅनेजमेंट कंट्रोल देखील देण्यात येईल.

17 मार्च शेवटची तारीख

एअर इंडिया खरेदी करण्यात एक्सप्रेशन ऑफ इंट्रेस्ट म्हणजे रुची असलेल्या कंपन्यांना 17 मार्च पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. एएनआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार लिलावात टाटा समूह, हिंदुजा, इंडिगो, स्पाइसजेट आणि काही खासगी इक्विटी कंपन्या देखील सहभागी असल्याचे समजते आहे. एअर इंडियाच्या लिलावात सहभागी होण्यासाठी विदेशी कंपन्या देखील हिंदुस्थानी कंपन्यांशी करार करण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाची आर्थिक स्थिती खराब असताना देखील हिंदुस्थानसह जगभरातील मोठ मोठ्या कंपन्यांना एअर इंडिया खरेदी करण्यात रस आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एअर इंडियाचे जाळे पसरलेले आहे, तसेच ट्रॅफिक राईट, लंडन-दुबई सारख्या मोठ्या महत्त्वपूर्ण विमानतळावर विशेष स्लॉट देखील आहेत. त्यांच्याकडे टेक्निकल सपोर्ट आणि मोठ्या प्रमाणवर मनुष्यबळ आहे. या कारणांमुळेच जगभरातील कंपन्यांना एअर इंडियात रस आहे.

डिसेंबरमध्ये मंत्र्यानीच दिले होते संकेत

कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडियाला विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, ‘सरकार एअर इंडियाची 100 टक्के हिस्सेदारी विकणार आहे.’ लोकसभेत बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

या सरकारी कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्यासाठी सरकार कागदपत्रे तयार करीत असून निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2020 निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या