इस्रायल-इराणमधील तणाव शिगेला; एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं केली रद्द

इस्रायलसह मध्यपूर्व देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. इस्रायलचे हमाससोबत सुद्ध सुरू असून दुसरीकडे इराणसोबतही तणाव शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला असून तेल अवीवकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहे. 8 ऑगस्टपर्यंत उड्डाणे रद्द राहणार असून त्यानंतर पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. एअर इंडियाने निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली.

इराणची राजधानी तेहरान येथे हमासच्या बड्या नेत्याची हत्या झाल्याने मध्यपूर्व देशांमध्ये तणाव वाढला आहे. या हत्येमध्ये इस्रायलचा हात असल्याचा थेट आरोप इराणने केला असून याचा बदला घेण्याची घोषणाही केली. त्यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद मेजेशकियान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हमासच्या राजकीय ब्युरोचा प्रमुख इस्माइल हनीह तेहरानला आले होते. ते ज्या इमारतीमध्ये थांबले होते ती इमारत हवाई हल्ला करून उडवण्यात आली. यात इस्माइल हनीन यांच्यासह त्यांचा सुरक्षारक्षकही ठार झाला होता.

या हल्ल्यानंतर मध्यपूर्व देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलल्या होत्या. अनेक देशांनी याची कठोर शब्दांमध्ये निंदा करत याचा बदला घेण्याची भाषा केली होती. इराणनेही या हल्ल्यामध्ये इस्रायलचा हात असल्याचा आरोप करत बदला घेण्याची धमकी दिली आहे.

दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचल्याने एअर इंडियाने 8 ऑगस्टपर्यंत तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. याआधी लेबनानची राजधानी बेरूत येथील हिंदुस्थानी दुतावासाने गुरुवारी पुढील आदेशापर्यंत इस्रायलसह पश्चिम आशियाई देशांचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता. तसेच मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या होत्या.