एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षांसाठी पाठवणार बिनपगारी सक्तीच्या रजेवर

872

कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असून यातून विमान कंपन्यांची देखील सुटका झालेली नाही. या काळात विमान कंपन्यांना झालेले नुकसान आणि अगोदरच कंपनीवर असलेला कर्जांचा डोंगर यामुळे एअर इंडिया प्रशासनाने आपल्या कर्मचाऱयांना थेट पाच वर्षाची बिनपगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटातून वाचण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असून किती कामगार या निर्णयाचे लाभ घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने काही दिवसांपूर्वीच 10 टक्के पगार कपातीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता थेट कर्मचाऱयांना सुट्टी देण्याचाच निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या अगोदर एका खासगी विमान कंपनीनेदेखील या स्वरुपाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियाने थेट पाच वर्षाच्या सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. एका खासगी वृत्तसंस्थेच्या वृत्तानंतर कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांनी कर्मचाऱयांना सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एअर इंडियातील कर्मचाऱयांना सहा महिने, दोन वर्ष अथवा पाच वर्ष विना पगार सुट्टीवर पाठवले जाऊ शकते. ज्या कर्मचाऱयांना विना पगार सुट्टीवर पाठवले जाणार आहे, त्यांना वैद्यकीय सुविधा आणि पास आदी सुविधा कंपनी देणार आहे. तर सुट्टीवर पाठविण्यात येणाऱया कर्मचाऱयांना कंपनीच्या परवानगी शिवाय इतर कोणत्याही कंपनीत काम करता येणार नसल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱयांच्या कामांचे ऑडीट होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असताना सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले असून कर्मचाऱयांमध्येदेखील उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, सुट्टीचा निर्णय घेताना कर्मचार्यांच्या संदर्भातील हा निर्णय त्यांचे आरोग्य, कामाची क्षमता, मागील सुट्टयांचे रेकॉर्ड, कामातील सातत्य आणि कामाचे मूल्य आदी गोष्टींचा विचार करून घेतला जाणार आहे. मुख्य कार्यालय आणि स्थानिक कार्यालयातील प्रमुख प्रत्येक कर्मचाऱयांचे मुल्यांकन करणार असल्याचे कळते.

15 ऑगस्टपर्यंत यादी तयार होणार
या नव्या निर्णयानुसार या सुट्टीसाठीची एक अंतिम यादी तयार होणार असल्याचे कळते. ज्यात जनरल मॅनेजर (पर्सनल), जनरल मॅनेजर (फायनान्स) आणि संबंधित विभागात समितीची स्थापना केली जाईल. ही समिती 15 ऑगस्टपर्यंत अशा कर्मचाऱयांची यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर कर्मचाऱयांना विना पगार सुट्टीवर पाठविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळते.

आपली प्रतिक्रिया द्या